मालेगाव : पेशव्यांचे सरदार नारोशंकर राजेबहाद्दर यांनी भुईकोट किल्ला बांधला, तेव्हापासून अस्तित्वात असलेल्या मालेगावातील किल्ला हनुमान मंदिराची जागा आता चक्क विक्री करण्याचा घाट घालण्यात आला आहे. जवळपास तीनशे वर्षे जुन्या आणि असंख्य भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या या मंदिराची जागा खुद्द सरदार नारोशंकर यांच्याच वारसांकडून विक्री करण्याच्या हालचाली इतक्या वर्षांनंतर सुरू झाल्या आहेत. हा धक्कादायक प्रकार उजेडात आल्यावर त्या विरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून मालेगावात हे काय चाललंय, असा संतप्त प्रश्न उपस्थित केला जात आहे.
सन १७४० मध्ये सरदार नारोशंकर यांनी येथील मोसम नदीच्या काठावर भुईकोट किल्ल्याची निर्मिती केली. त्याच सुमारास किल्ल्याच्या शेजारी उत्तरेकडील बाजूस हनुमान मंदिराची उभारणी केली गेल्याचे सांगण्यात येते. किल्ल्याच्या शेजारी असल्याने किल्ला हनुमान या नावानेच हे मंदिर ओळखले जात आहे. या मंदिरात हनुमानाच्या दोन मूर्ती आहेत. कालांतराने भक्तगणांकडून या मंदिराचा वेळोवेळी जीर्णोद्धार केला गेला.
सर्वे क्रमांक १०६ मधील एकूण ८८९ चौरस मीटर या क्षेत्रावर हे हनुमान मंदिर आहे. तसेच मंदिराच्या एका बाजूला भगवंत व्यायामशाळा आणि दुसऱ्या बाजूला मंदिराची देखभाल करणाऱ्या सेवेकरीला निवासासाठी पूर्वापार दिलेली जागा आहे. अनेक वर्षांपासून हे संपूर्ण क्षेत्र या तिन्ही घटकांच्या कब्जात आणि वहिवाटीत आहे. या क्षेत्रावरील भोगवटदार म्हणून महापालिकेची करपट्टी आणि विजेची देयके सुद्धा या तिन्ही घटकांच्या नावे आहेत.
नगर भूमापनच्या ७/१२ उताऱ्यानुसार या संपूर्ण क्षेत्रावर मूळमालक सदरी राजेबहाद्दर यांच्या चार वारसांच्या नावे वडिलार्जित मारुती मंदिर अशी नोंद असल्याचे दिसत आहे. त्याच्या आधारे राजेबहाद्दर यांच्या आजच्या दोन वारसदार महिलांनी गेल्या एप्रिल महिन्यात या जागेची विल्हेवाट लावण्याच्या हेतूने कमर खान नसीम खान (मालेगाव) या व्यक्तीच्या नावाने जनरल मुखत्यारपत्र करून दिले आहे. त्यानुसार खान यांना या जागेचे खरेदीखत नोंदविण्याचे संपूर्ण अधिकार प्राप्त झाले आहेत. त्यावरून ही जागा विक्री करण्याच्या हालचाली सुरू झाल्याचे स्पष्टपणे अधोरेखित होत असल्यामुळे
हनुमान भक्तांमध्ये असंतोष उफाळून आला आहे. ३०० वर्षांहून अधिक काळापासून अस्तित्वात असलेल्या मंदिराची जागा अशाप्रकारे विक्री करण्याची हिम्मत कशी केली जाऊ शकते, असा संतप्त प्रश्न उपस्थित केला जात आहे. तसेच हा प्रयत्न बेकायदेशीर असल्याची भूमिका घेत मंदिर व्यवस्थापनाकडून संबंधितांना त्या विरोधात वकिलामार्फत नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.
या मंदिराच्या जागेवर मारुतीरायांचे कायद्यानुसार एक अढळ स्थान आहे. त्यामुळे त्यांना कुणालाही तेथून विस्थापित करण्याचा अधिकार नाही. खरेतर मंदिराची जागा ही भुईकोट किल्ल्याच्या जागेचाच एक भाग आहे. शासनाकडून संस्थानिकांच्या जागा जेव्हा ताब्यात घेतल्या गेल्या, तेव्हा किल्ला आणि आसपासच्या सर्व जागा देखील शासनजमा झाल्या. त्यावेळी या मंदिराची जागाही कायद्याने शासनाच्या ताब्यात जाणे अपेक्षित होते, मात्र तांत्रिक चुकीमुळे ते राहून गेले असावे. त्यामुळे ७/१२ उताऱ्यावर राजेबहाद्दर व मारुती मंदिर अशी नावे मालकी हक्कात दिसत आहेत. त्याचा गैरफायदा घेऊन राजेबहाद्दर यांच्या वारसदारांचा ही जागा विक्री करण्याचा प्रयत्न दिसून येत आहे. यापूर्वी संबंधितांकडून अशाच प्रकारे शहरातील अन्य जागा विक्री करण्यात आल्या. प्रथमदर्शनी ही शासनाची फसवणूक असल्याचे दिसत आहे. – ॲड शिशिर हिरे (मंदिर व्यवस्थापनाचे वकील)
मंदिराच्या शेजारी १९२८ मध्ये भगवंत व्यायाम शाळा सुरू करण्यात आली. १९५२ मध्ये धर्मदाय आयुक्तांकडे व्यायाम शाळेची संस्था म्हणून नोंदणी झाली. दिवंगत भगवंतराव राजेबहाद्दर हे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष होते. समाजाभिमुख कार्य करण्याबद्दल राजेबहाद्दर घराण्याची विशेष परंपरा राहिली. मात्र त्यांच्या आजच्या वारसदारांकडून साक्षात मंदिराची जागा जेव्हा विक्री करण्याचा प्रयत्न होताना दिसतो, तेव्हा पूर्वजांची परंपरा ते धुळीला मिळवत आहेत, असाच त्याचा अर्थ आहे. – दीपक सावळे (विश्वस्त भगवंत व्यायामशाळा)
कायदेशीर सल्ला घेतल्यानंतर आम्ही आमची पुढची भूमिका जाहीर करू. परंतु आमच्या पूर्वजांनी स्थापना केलेले मंदिर पाडण्याचा किंवा विक्री करण्याचा विचार आम्ही स्वप्नात देखील करू शकत नाही, एवढे मात्र नक्की. – राधिका राजेबहाद्दर (पुणे)