जिल्हा शासकीय रुग्णालयात प्रशिक्षणार्थी सामूहिक आरोग्य अधिकाऱ्यास करोनाची लागण झाल्यामुळे करोना कक्षात उपचार करणारे डॉक्टर, परिचारिकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. त्याच्या निकट संपर्कात असणाऱ्या जिल्हा रुग्णालयातील चार सहकाऱ्यांना तातडीने विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले. संबंधित रुग्ण काही दिवसांपूर्वी सुरगाणा तालुक्यात आपल्या गावी गेला होता. त्यामुळे कुटुंबियांसह निकट संपर्कात आलेल्या अन्य १८ जणांचे विलगीकरण केले जाणार आहे. शहरातील म्हसरूळ रस्त्यावरील चित्रा अपार्टमेंट या त्याच्या निवासस्थान सभोवतालचे ५०० मीटरचे क्षेत्र प्रतिबंधित करण्यात आले आहे.
रविवारी रात्री प्राप्त झालेल्या अहवालात करोना कक्षात काम करणाऱ्या संबंधित व्यक्तीचा अहवाल सकारात्मक आला. मूळ सुरगाणा तालुक्यातील तळपाडा येथील ही व्यक्ती प्रशिक्षणासाठी तात्पुरत्या स्वरुपात शहरात वास्तव्यास आहे. आरोग्यवर्धिनी केंद्रात सामूहिक आरोग्य अधिकारी नियुक्त केले जातात. त्यांचे प्रशिक्षण हा अधिकारी घेत होता. करोना कक्षात त्याने काम पाहिले आहे.
संबंधिताचा अहवाल आल्यानंतर त्याच्या संपर्कातील आलेल्यांची माहिती संकलित करण्याचे काम सुरू झाले. त्याच्या निकट संपर्कातील रुग्णालयातील चार सहकाऱ्यांचे तातडीने विलगीकरण करण्यात आले. करोना कक्षात काम सुरू केल्यापासून ते फारसे घरी जात नव्हते. या कक्षात काम करणाऱ्यांची निवास, भोजन व्यवस्था जिल्हा रुग्णालय परिसरातील एका इमारतीत करण्यात आली आहे. अपवादात्मक स्थितीत कधीतरी तो रात्री घरी केवळ झोपण्यासाठी जात असे. त्याचे निवासस्थान परिसरातील ५०० मीटरचे क्षेत्र प्रतिबंधित म्हणून जाहीर करण्यात आल्याचे महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्याने सांगितले.
रुग्णालयात त्याच्या निकटच्या संपर्कात आलेल्या चार सहकाऱ्यांना रात्रीच विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले. त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. संबंधित आरोग्य अधिकारी आठ दिवसांपूर्वी आपल्या गावी गेला होता. तिथे त्याच्या निकट संपर्कात आलेल्या १८ जणांचे विलगीकरण केले जाणार असल्याचे आरोग्य उपसंचालक एम. आर. पटणशेट्टी यांनी सांगितले. शहरातील निवासस्थान सभोवतालच्या सुमारे २५० कुटुंबियांचे सर्वेक्षण केले जाणार असल्याचे महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नमूद केले.