आदिवासीबहुल सुरगाणा तालुक्यात करोनाचा प्रवेश

नाशिक : शहरासह ग्रामीण भागात करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. आतापर्यंत प्रादुर्भावापासून दूर राहिलेल्या आदिवासीबहुल

सुरगाणा तालुक्यात करोनाने प्रवेश केला आहे बुधवारी दुपापर्यंत जिल्ह्य़ात करोनाचे सात नवे रुग्ण आढळले. यामुळे एकूण रुग्णसंख्या १६९० वर पोहचली आहे. उपचाराअंती १०९३ रुग्ण बरे होऊन घरी परतले तर ४९५ रुग्ण सध्या उपचार घेत आहेत. १०२ रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.

मालेगाव परिसरात करोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात येत असताना नाशिक शहरात करोनाबाधितांची संख्या वेगाने वाढत आहे. २४ तासात शहरात २९ रुग्ण आढळले. शहरातील रुग्णांची संख्या ५०० च्या दिशेने वाटचाल करीत आहे. दाट लोकवस्तीत रुग्ण आढळल्याने सामाजिक पातळीवर त्याचा फैलाव होण्याचा धोका आहे. आडगाव नाकालगतच्या गुंजाळवाडी येथील चार वर्षांचा बालक करोनाबाधित आढळळा. पंचवटीतील भोरे सदन, नागचौक, बालाजी सदन, सातपूर कॉलनी, जुने नाशिकमधील आझाद चौक, जयदीपनगर, पेठ रस्त्यावरील फुलेनगर, नाईकवाडीपुरा, कुंभारवाडा, टाकळी रस्ता, गायकवाडनगर, बागवानपुरा या भागात हे रुग्ण आढळले. भिवंडी येथील २६ वर्षांच्या डॉक्टर महिलेचा अहवाल सकारात्मक आला. त्यांनी नांदगावहून नाशिकला प्रवास केला आहे. जुने नाशिक भागात रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढत आहे.

सम-विषम निकषाचे पालन व्यापारी करत नाही. खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये गर्दी उसळत आहे. टाळेबंदी शिथील करण्यासाठी पावले टाकली जात असतांना करोनाचे रुग्ण वेगाने वाढत आहेत.

या पार्श्वभूमीवर, पालिका आयुक्त राधाकृष्ण गमे, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे यांनी बुधवारी मध्यवर्ती भागात भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. शहरात आतापर्यंत करोनाचे ४८७ रुग्ण आढळले आहेत. त्यातील २२ जणांचा मृत्यू झाला. १६८ रुग्णांना घरी सोडण्यात आले. सध्या २९७ रुग्ण उपचार घेत आहेत. बाधित रुग्णांच्या संपर्कातील काही अहवाल प्रलंबित असल्याने ही संख्या अधिक वाढण्याची धास्ती आहे. रुग्णांच्या संख्येनुसार प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या विस्तारत आहे. सध्या शहरात ९७ प्रतिबंधित क्षेत्र असल्याचे पालिकेने म्हटले आहे.

शहराप्रमाणे ग्रामीण भागात स्थिती आहे. नव्याने आढळलेले सात रुग्ण हे ग्रामीण भागातील आहेत. सुरगाणा तालुका आतापर्यंत करोनामुक्त राहिला होता. परंतु, आता या तालुक्यात ३० वर्षांच्या व्यक्तीला प्रादुर्भाव झाल्याचे उघड झाले. अंदरसूल, मनमाड, माडसांगवी, एकलहरे या भागात नव्याने रुग्ण आढळले. एक रुग्ण चोपडा (जळगाव) येथील आहे. मालेगाव महापालिका क्षेत्रात सध्या सर्वात कमी म्हणजे ८७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. नाशिक ग्रामीण भागात ८९, तर जिल्ह्य़ाबाहेरील १६ रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार केले जात आहेत.