करोनाच्या संकटामुळे घरात बंदिस्त झालेली तरुणाई आरोग्याबाबत जागरूक होऊन रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. परीक्षा न होताच पदवी प्रमाणपत्र मिळावे, अशी बहुतेकांची अपेक्षा आहे. तसेच या करोना संकटातून भारत लवकरच पुन्हा भरारी घेईल. परंतु, देशात बेरोजगारी वाढण्याची भीती तरूणाईत असल्याचे एका ऑनलाइन सर्वेक्षणात दिसून आले आहे.
येथील हं.प्रा.ठा. कला आणि रा.य.क्ष. विज्ञान महाविद्यालयच्या जनसंज्ञापन आणि पत्रकारितेच्या द्वितीय वर्षांतील विद्यार्थ्यांनी प्राजक्ता नागपुरे हिच्या नेतृत्वाखाली केलेल्या सर्वेक्षणात टाळेबंदीतील तरुणाईविषयी काही निष्कर्ष काढले आहेत. तरुणाई भरकटलेली असल्याचे साधारणपणे बोलले जात असले तरी, या सर्वेक्षणातून बरेच सकारात्मक निष्कर्ष निघाले आहेत. या संकटातून बाहेर पडून लवकरच पूर्वीचे दिवस येतील, असा विश्वास बहुतांश तरुणांनी व्यक्त केला आहे. करोनाला प्रतिबंधासाठी टाळेबंदीची गरज होतीच, पण ती लवकर संपुष्टात यावी, असे त्यांचे म्हणणे आहे. परीक्षा न घेता पदवी मिळावी असे ६३ टक्के तरुणांना वाटते. तर ३७ टक्क्य़ांनी यावर नकारात्मक मत नोंदविले. बेरोजगारी वाढणार असल्याचे ७४ टक्के तरुण सांगतात. तरी यातून भारत सावरेल, हा विश्वासही दिसतो.
टाळेबंदीमुळे जीवनाचा खरा अर्थ कळला. जीवनात काही खरे नसते. अनेकांनी घरातील कामे केल्याचे नमूद केले. बहुतेकांनी तंदुरुस्तीसाठी व्यायाम, योगा, इंटरनेटच्या माध्यमातून झुम्बा, एरोबिक्स या नृत्य प्रकारांचाही आधार घेतला. घरात बसून काही नवीन कौशल्ये प्राप्त करण्याच्या धडपडीत आहे. अत्यावश्यक कामांसाठी घराबाहेर पडावे लागल्याचे निम्म्याहून अधिक तरुणांनी मान्य केले.
घरातच बंदिस्त झाल्यामुळे कुटुंबाचे महत्व समजले. एकमेकांचे प्रश्न समजले. जास्त काळ रहावे लागल्याने ताणतणावही निर्माण झाला. खासगीपणा जपता येत नसल्याचे काही तरूण म्हणतात. मित्रमैत्रिणींच्या सहवासाला मुकावे लागले. टाळेबंदीमुळे चंगळवादाला लगाम बसला.
अन्न, वस्त्र आणि निवारा याच माणसाच्या प्रमुख गरजा असून बाकी चोचले असल्याचे जवळपास निम्म्या तरुणांचे मत झाले. सध्या अनेक जण कुटुंबासमवेत दूूरचित्रवाणीवर कार्यक्रम पाहतात. याच काळात नेटफ्लिक्स, हॉटस्टार, प्राइम व्हिडिओ आणि समाज माध्यमाला पसंती दिली जात असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या काळात गरजूंना मदत करावी, असे अनेकांना वाटते. परंतु, प्रत्यक्ष मदत करणाऱ्यांची संख्या ३६ टक्के होती. शेतकरी, शेतमजूर, स्थलांतरित मजूर, हातमजूर यांचे हाल झाल्याचे बहुतेकांचे मत आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य व्ही. एन. सूर्यवंशी, उपप्राचार्या तथा पत्रकारिता विभागाच्या प्रमुख डॉ. वृन्दा भार्गवे, प्रा. रमेश शेजवळ यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्वेक्षण ऑनलाइन करण्यात आले.