नाशिक : अतिशय दाट वस्तीतील सुरवसे लेन येथे वैश्य वाड्याच्या मागील बाजूची भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोन महिला जखमी झाल्या होत्या. या प्रकरणी जेसीबी चालकाविरुध्द सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या शनिवारी ही घटना घडली होती. संजय जोशी असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित जेसीबी चालकाचे नाव आहे.

घनकर लेन येथील जोशी वाड्याचे नुतनीकरणाचे काम सुरू असून रविवार कारंजा परिसरातील वैश्यवाडा आणि जोशी वाडा या दोन्ही वाड्यांची एकत्रित भिंत आहे. एका वाड्याचे काम करतांना आसपासच्या वाड्यांचा विचार न करता आणि कोणत्याही उपाययोजना न करता जेसीबीच्या सहाय्याने खोदकाम करीत असतांना ही घटना घडली होती. भिंत कोसळल्याने संगिता वैश्य आणि रिता वैश्य हे जखमी झाले. याच कुटुंबातील अभिषेक वैश्य (३०) आणि शौर्य (पाच) हे देखील जखमींबरोबर वरच्या मजल्यावर अडकून पडले होते. अग्निशमन दलाने खास शिडी लावून दुसऱ्या बाजूने जखमींसह इतरांना सुखरूपपणे बाहेर काढले. या प्रकरणी जेसीबी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रिक्षाचालकाकडून मारहाण

कट मारल्याचा जाब विचारल्याने रिक्षा चालकासह त्याच्या साथीदाराने एकास बेदम मारहाण केल्याची घटना गंगापूर रस्त्यावरील मॅरेथॉन चौकात घडली. या बाबत चेतन राठोड या युवकाने तक्रार दिली. मॅरेथॉन चौकातून पायी जात असतांना रिक्षाने त्याला कट मारला. याबाबत त्याने जाब विचारला असता चालकासह रिक्षात मागे बसलेल्या त्याच्या साथीदाराने बेदम मारहाण केली. यावेळी लाकडी दांडक्याचा संशयितांनी वापर केला. यात चेतन राठोड जखमी झाला. या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टवाळखोरांकडून एकास मारहाण

मुलीकडे भ्रमणध्वनी क्रमांक का मागत आहात, अशी विचारणा करण्यास गेलेल्या मुलीच्या वडिलांना तीन टवाळखोरांनी बेदम मारहाण केली. चुंचाळे शिवारातील माऊली चौकात ही घटना घडली. यावेळी लोखंडी पाईपचा वापर करण्यात आल्याने वडील जखमी झाले. या प्रकरणी मुलीच्या वडिलांनी तक्रार दिली. त्यावरून प्रकाश जाधव आणि त्याचे तीन साथीदार (रा.माऊली चौक,चुंचाळे) यांच्याविरुध्द अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. संशयित काही दिवसांपासून रस्ता अडवून मुलीकडे भ्रमणध्वनी क्रमांकाची मागणी करीत होते. ही बाब तिने घरी सांगितल्यावर वडिलांनी संशयितांना जाब विचारला असता ही घटना घडली. संशयितांनी शिवीगाळ करीत त्यांना लाथाबुक्क्यांनी आणि लोखंडी पाईपने मारहाण केली.