जेवणकरून मैत्रिणींसोबत रस्त्याने पायी जाणाऱ्या युवतीच्या हातातील भ्रमणध्वनी दुचाकीवरून आलेल्या भामटय़ांनी खेचून नेला. व्ही. एन. नाईक महाविद्यालय ते कुलकर्णी उद्यान दरम्यान ही घटना घडली. याबाबत करिष्मा शिंदे या युवतीने तक्रार दिली. करिष्मा गंगापूर रस्त्यावर वास्तव्यास आहे. रात्री मैत्रिणींसोबत ती बाहेर  भोजनासाठी गेली होती. तेथून चार मैत्रिणींसोबत नाईक महाविद्यालय ते कुलकर्णी उद्यानदरम्यानच्या मार्गाने येत असताना हा प्रकार घडला. या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कामगाराकडील दागिन्यांची चोरी

सराफी दुकानात दागिने घेऊन जाणाऱ्या कामगारास बोलण्यात गुंतवून दोघा चोरटय़ांनी सुमारे दोन लाख रुपये किमतीचे अलंकार हातोहात लांबविल्याची घटना सराफ बाजारात घडली. या संदर्भात श्रीकांत सामंत (शिवपुरी चौक, उत्तमनगर) यांनी तक्रार दिली. सामंत सराफ बाजारातील स्वामी समर्थ ड्रायप्रेस या सराफी पेढीत कामास आहेत. ते सुमारे दोन लाख रुपये किमतीचे दागिने घेऊन दुकानात जात असताना मुन्ना पॉलिशवाला यांच्या दुकानासमोर त्यांना दोन संशयितांनी गाठले. बोलण्यात गुंतवून ठेवत संशयितांनी सामंत यांच्या ताब्यातील दोन लाख रुपयांचे दागिने घेऊन पलायन केले. या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अल्पवयीन मुलीचा विनयभंग

लग्नाची मागणी करीत अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना एका महाविद्यलयात घडली. मुलीने या घटनेची माहिती कुटुंबीयांना दिल्यानंतर पित्याने संशयित त्रिकुटास गाठून जाब विचारला असता संशयितांनी शिवीगाळ करीत ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी त्या अल्पवयीन मुलीने तक्रार केली. संशयित आरिफ सय्यद हा काही महिन्यांपासून आपल्या साथीदारा समवेत मुलीची छेड काढत होता. संशयिताने महाविद्यालयात गाठून लग्नाची मागणी करत मुलीचा विनयभंग केला.  पोलिसांनी आरिफ अफसर सय्यद, अरजान सय्यद, सलमान पठाण या संशयितांविरुध्द मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भ्रमणध्वनींची चोरी

पंचवटीत अमृतधाम-तारवालानगर रस्त्यावरील अंबाजीनगर भागात चोरटय़ांनी दुकान फोडून हजारो रुपयांचे भ्रमणध्वनी आणि साहित्य चोरण्यात आले. याबाबत कुशल मुसळे (सागर शिल्प अपार्टमेंट, औदुंबरनगर) यांनी तक्रार दाखल केली. मुसळे यांचे अंबाजीनगर येथील मनमंदिर बंगला परिसरात भ्रमणध्वनी विक्री आणि दुरुस्तीचे दुकान आहे.

चोरटय़ांनी बंद दुकानाचा कडीकोयंडा तोडून गल्ल्यातील रोकड, भ्रमणध्वनी आणि दुरुस्तीचे साहित्य असा हजारो रुपयांचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.