नाशिक : मालेगावातील रस्ता लूटमारीच्या घटनेतील संशयिताला पकडण्यासाठी गेलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकावर बुधवारी हल्ला करण्यात आला.  संशयितांचा माग काढण्यासाठी पोलिसांनी चार पथके तयार केली आहेत.  मालेगाव येथील आझाद नगरात एका व्यक्तीचे अपहरण करून त्याच्या खिशातील एटीएम काढून घेत त्या व्यक्तीला अन्य ठिकाणी सोडण्यात आले. या  प्रकरणात संशयित जमाल बिल्डर आणि सलमान यांचा सहभाग असल्याचे उघड झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास संशयित हे सरदार नगर परिसरात असल्याची माहिती मिळाली. हवालदार गिरीश निकुंभ आणि पोलीस नाईक सुभाष चोपडा यांनी बुधवारी रात्री सापळा रचला. दोघेही संशयित त्या ठिकाणी येताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. सलमानने पोलिसांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. जमालने बंदुकीतून पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला. तो चुकविण्यासाठी पोलीस पांगले. या संधीचा फायदा घेत संशयित फरार झाले. याविषयी स्थानिक गुन्हे शाखेचे हेमंत पाटील यांनी माहिती दिली.आयेशा नगर येथे झालेल्या दरोडा प्रकरणातील हे दोन्ही सराईत गुन्हेगार आहेत. त्यांनी पोलिसांवर हल्ला केला. संशयितांचा शोध घेण्यासाठी चार पथके तैनात करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.