नाशिक : गोदावरीच्या काठावर नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये होणाऱ्या बहुचर्चित सिंहस्थ कुंभमेळ्यातील मुख्य तीन पर्वण्यांच्या तारखा जाहीर झाल्या असून दोन्ही ठिकाणी प्रथम आणि द्वितीय पर्वणी एकाच दिवशी अनुक्रमे दोन ऑगस्ट आणि ३१ ऑगस्ट रोजी आहे. नाशिकमध्ये तृतीय पर्वणी ११ सप्टेंबर रोजी तर, त्र्यंबकेश्वर येथे १२ सप्टेंबर रोजी राहणार आहे.

ऐन पावसाळ्यात या पर्वण्या आहेत. तीन पर्वण्यांपैकी दोनचे मुहूर्त एकाच दिवशी असल्याने अमृत स्नानासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी विभागली जाईल. रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली येथे झालेल्या बैठकीत त्र्यंबकेश्वर आणि नाशिक येथे २०२७ मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यातील तीन मुख्य पर्वण्या आणि इतर पर्वस्नानांचे मुहूर्त जाहीर करण्यात आले.

या बैठकीच्या निमित्ताने नाशिकमधील वैष्णवपंथीय तीन आणि त्र्यंबकेश्वरमधील १० वैष्णवपंथीय आखाडे प्रथमच एकत्र आले. आगामी कुंभमेळ्यास त्र्यंबकेश्वर येथे ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी तर, नाशिकमध्ये २४ जुलै २०२७ रोजी ध्वजवंदनाने प्रारंभ होईल. मुख्य तीन पर्वण्यांच्या दिवशी दोन्ही ठिकाणी साधू-महंतांची अमृत (शाही) मिरवणूक निघते. प्रत्येक आखाड्याची क्रमवारी, स्नानाचा कालावधी निश्चित असतो. त्यानुसार साधू-महंतांचे स्नान झाल्यानंतर भाविकांना गोदावरीत डुबकी मारता येते.

मुख्य पर्वण्यांबरोबर सिंहस्थ काळात त्र्यंबकेश्वर येथे तीर्थस्नानाचे २९ आणि नाशिकमध्ये ४५ विशेष मुहूर्त जाहीर करण्यात आले. या व्यतिरिक्त सिंहस्थ पर्वकाळातील सर्व एकादशी, पौर्णिमा, अमावस्या, वैधृती-व्यतीपात योग आदी दिवस हे भाविकांसाठी तीर्थस्नान, दर्शन पर्व असतील. कुंभमेळ्याचा समारोप दोन्ही ठिकाणी २४ जुलै २०२८ रोजी ध्वजावतरणाने होणार आहे. आगामी कुंभमेळ्याचा कालावधी मोठा असल्याने गतवेळच्या तुलनेत तीर्थस्नानाचे दिवस अधिक झाल्याचे पुरोहित संघाकडून सांगण्यात आले.

आगामी सिंहस्थ कुंभमेळा जास्त काळ चालणार आहे. साधू-महंत आणि पुरोहित संघाने जाहीर केल्यानुसार स्नानासाठी जास्त मुहूर्त आहेत. त्यामुळे एकाच तारखेला गर्दी करण्याची आवश्यकता नाही. यामुळे भाविकांच्या गर्दीचे योग्य नियोजन करण्याची संधी मिळाली आहे. कुंभमेळा सुव्यवस्थित करण्याचा आमचा प्रयत्न आहे.- देवेंद्र फडणवीस (मुख्यमंत्री)

त्र्यंबकेश्वर मुख्य पर्वणी
प्रथम – दोन ऑगस्ट २०२७

द्वितीय – ३१ ऑगस्ट २०२७
तृतीय – १२ सप्टेंबर २०२७

नाशिक मुख्य पर्वणी

प्रथम – दोन ऑगस्ट २०२७
द्वितीय – ३१ ऑगस्ट २०२७

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तृतीय – ११ सप्टेंबर २०२७