नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यातील नियोजनाविषयी अनभिज्ञ असणारे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी आढावा बैठक घेत भाजपचे गिरीश महाजन आणि शिवसेना शिंदे गटाच्या दादा भुसे यांना शह दिला होता. नाशिकच्या पालकमंत्रीपदाच्या स्पर्धेतून महायुतीत कुणीही मागे हटण्यास तयार नाही. त्यामुळेच की काय, भुजबळ यांच्या पाठोपाठ आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे लवकरच कुंभमेळ्याची आढावा बैठक घेणार आहेत. मित्रपक्षांकडून भाजपला खिंडीत गाठण्याची धडपड होत आहे.

गोदावरी काठावर भरणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याला एक ते दीड वर्षांचा कालावधी बाकी आहे. कुंभमेळ्यासाठी हजारो कोटींचे आराखडे सादर झाले. यातील काही कामांना मंजुरी मिळाल्याचे सांगितले गेले. परंतु, प्रत्यक्षात कामांना सुरूवात झालेली नाही. कुंभमेळ्याची जबाबदारी भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे आहे. नाशिकच्या पालकमंत्रीही त्यांची नियुक्ती झाली होती. परंतु, मित्रपक्षांच्या विरोधामुळे त्यास स्थगिती द्यावी लागली.

कुंभमेळा आणि महापालिका निवडणूक यामुळे नाशिकच्या पालकमंत्रीपदाला महत्व प्राप्त झाले आहे. अनेक महिन्यांपासून महायुतीच्या नेत्यांना हा तिढा सोडविता आलेला नाही. उलट, अंतर्गत स्पर्धेमुळे तो निरनिराळे वळण घेत आहे. पालकमंत्री पदासाठी तिन्ही पक्षातील रस्सीखेच कुंभमेळ्याच्या स्वतंत्र बैठकांमधून अधोरेखीत होताना दिसते. भाजप आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) यांच्यातील संघर्षामुळे रखडलेल्या नाशिकच्या पालकमंत्रीपदाच्या वादाला स्वातंत्र्य दिनी गिरीश महाजन यांना ध्वजवंदनाची संधी मिळाल्याने कलाटणी मिळाली होती. राष्ट्रवादीचे (अजित पवार) ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि गिरीश महाजन यांच्यात कलगीतुरा रंगला होता.

पालकमंत्री पदासाठी सात आमदारांचा दाखला देत राष्ट्रवादी अजित पवार गट तर, दादा भुसे यांच्यासाठी शिवसेना शिंदे गट आग्रही आहे. भाजपनेही हा विषय प्रतिष्ठेचा केलेला आहे. कुंभमेळ्याची जबाबदारी सांभाळणाऱ्या गिरीश महाजन यांच्याकडे नाशिकचे पालकमंत्रीपदही देण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. कुंभमेळा नियोजनात काही अपवाद वगळता मित्रपक्षातील मंत्री दूर राहिले होते. भुजबळ यांनी अलीकडेच जिल्हाधिकारी कार्यालयात सिंहस्थ कुंभमेळ्याची आढावा बैठक घेतली. आपण पालकमंत्री म्हणून नव्हे तर, मंत्री या नात्याने ही बैठक घेतली. स्थानिक मंत्री म्हणून तो आपला अधिकार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. जी कामे कुंभमेळ्यापूर्वी पूर्णत्वास जाणे अशक्य आहे, अशी नवीन कामे हाती घेऊ नये, अशी सूचनाही त्यांनी केली होती.