पिंपळगाव बाजारात शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडले

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

निर्यातमूल्य शून्य करूनही देशांतर्गत मागणीत कमालीची घट झाल्यामुळे स्थानिक घाऊक बाजारात कांद्याचे भाव गडगडले असून त्याचे पडसाद वेगवेगळ्या माध्यमातून उमटत आहेत. पिंपळगाव बसवंत बाजार समितीत मंगळवारी कांद्याचा सरासरी भाव क्विंटलला ४५० रुपयांपर्यंत घसरल्याने संतप्त शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडले. बाजार समितीच्या संचालकांनी व्यापारी व शेतकऱ्यांची संयुक्त बैठक बोलवित मध्यस्ती करण्याचा प्रयत्न केला. देशांतर्गत बाजारात मागणी नसल्याने ही स्थिती उद्भवल्याची स्थिती मांडण्यात आली. अखेर दोन तासानंतर या बाजार समितीत लिलाव पूर्ववत झाले. दुपारी सरासरी भाव ६५० रुपयांवर पोहोचला. कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लासलगावमध्ये सरासरी भाव ८०० रुपये होता.

सध्या कांद्याला मिळणाऱ्या भावात उत्पादन खर्चही भरून निघणार नसल्याची सार्वत्रिक प्रतिक्रिया आहे. कांद्याचे वाढते भाव रोखण्यासाठी काही महिन्यांपूर्वी किमान निर्यात मूल्यात केली गेलेली वाढ दीड महिन्यांपूर्वी शून्यावर आणण्यात आली. कारण, नव्याने बाजारात येणाऱ्या लाल कांद्याचे भवितव्य अडचणीत सापडले होते. हे मूल्य रद्द झाल्यामुळे निर्यातीला प्रोत्साहन मिळेल अशी अपेक्षा होती. त्या अनुषंगाने काही दिवस भावही काहीसे वधारू लागले. परंतु, देशातील इतर भागातील कांदा जसजसा बाजारात येऊ लागला, तसतसे स्थानिक पातळीवर भावात घसरणीची प्रक्रिया सुरू झाली. महिनाभरापूर्वी क्विंटलला १००० ते १२०० रुपयांवर असणारा कांदा सध्या थेट ६०० ते ७०० रुपयांपर्यंत आला आहे. म्हणजे मागील काही दिवसात कांदा भावात ४०० ते ५०० रुपयांची घट झाल्याचे शेतकरी सांगतात. मंगळवारी सकाळी पिंपळगाव बसवंत बाजार समितीत नेहमीप्रमाणे लिलावास सुरूवात झाली. ५०० ट्रॅक्टर आणि ४०० पीकअप व्हॅन इतकी आवक होती. सुरूवातीला कांद्यास सरासरी ४५० रुपये भाव पुकारला गेला. या भावात उत्पादन खर्च तर दूर वाहतूक खर्चही भरून निघणार नसल्याने शेतकरी संतप्त झाले. त्यांनी लिलाव पुकारण्यास विरोध करत ते बंद पाडले. शेकडो शेतकऱ्यांनी अत्यल्प भावावरून आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. लिलाव बंद पाडल्याची माहिती मिळाल्यावर बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी धाव घेतली. शेतकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, कोणी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.

अखेर बाजार समितीच्या कार्यालयात व्यापारी संचालक सोहनलाल भंडारी आणि शेतकऱ्यांची एकत्रित बैठक पार पडली. इतर भागातील उत्पादन हाती येऊ लागल्याने नाशिकच्या कांद्याची मागणी घटली आहे. त्यात गावठी कांद्याचेही इतरत्र आगमन झाल्यामुळे निर्यातीसाठी लाल ऐवजी त्याचा पर्याय स्वीकारला जातो. ही बाब कांद्याचे भाव कमी होण्यास कारक ठरल्याचा मुद्दा व्यापाऱ्यांनी मांडला. साडे चारशे रुपयांच्या सरासरी भावात वाहतूक व उत्पादन खर्च कसा भरून निघणार, असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला. जवळपास एक तास या मुद्यावरून चर्चा झडली. अखेरीस लिलाव सुरू करण्यास हिरवा कंदील दाखविण्यात आला. दोन तासानंतर लिलाव पूर्ववत झाल्यावर कांद्याला प्रतिक्विंटल ६५० रुपये भाव मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली. किमान ५०० ते कमाल ९५१ असा हा भाव होता. इतर बाजार समित्यांमध्ये आवक वाढल्यामुळे कांदा भावाची फारशी वेगळी स्थिती नाही. लासलगाव बाजार समितीत कांद्याला सरासरी ८०० रुपये भाव मिळाल्याची माहिती सभापती नानासाहेब पाटील यांनी दिली.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Decrement in onion prices
First published on: 10-02-2016 at 08:54 IST