अनिकेत साठे

नाशिक : करोना काळात आभासी प्रणालीन्वये परीक्षा घेताना कसरत करणाऱ्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची आता प्रत्यक्ष उपस्थितीत परीक्षा घेतानाही दमछाक झाल्याचे चित्र आहे. पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या लांबलेल्या परीक्षांनी २०२२-२३ या शैक्षणिक वर्षांचे वेळापत्रक विस्कटण्याच्या मार्गावर आहे. महाविद्यालये सुरू होण्याच्या सुमारास परीक्षांचा हंगाम सुरू आहे. त्यातील काही परीक्षा पुढील एक-दोन महिने चालतील. त्यांचे निकाल कधी लागतील, पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे प्रवेश कधी होतील, या विचाराने विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता आहे. मात्र, सर्व अभ्यासक्रमांची प्रत्यक्ष उपस्थितीत परीक्षा घेणारे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे राज्यातील एकमेव विद्यापीठ आहे. राष्ट्रीय सुट्टय़ा आणि तत्सम तांत्रिक मुद्यांचा विचार करून परीक्षांचे वेळापत्रक निश्चित केल्याचा दावा विद्यापीठाने केला आहे.

२०२१-२२ या मागील वर्षांचे शैक्षणिक सत्र मे २०२२ मध्ये संपुष्टात आले. त्या सत्राच्या परीक्षा जूनमध्ये होणे अपेक्षित होते. नियोजनाअभावी त्या रखडल्याचे सांगितले जाते. त्यामुळे काही अभ्यासक्रमांच्या परीक्षा थेट ऑगस्ट, सप्टेंबपर्यंत होणार आहेत. ४५ दिवसांच्या मुदतीत त्यांचे निकाल लागतील.

म्हणजे चालू वर्षांचे सत्र थेट सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये सुरू होण्याचे चिन्ह आहे. पदवी परीक्षेचे निकाल जाहीर होईपर्यंत पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे प्रवेश होऊ शकणार नाही. दुसरीकडे काही अभ्यासक्रमांच्या सध्या परीक्षा सुरू असल्याने १२ वीनंतर कला, वाणिज्य व विज्ञान शाखेत पदवीच्या पहिल्या वर्षांत प्रवेशित विद्यार्थ्यांना महाविद्यालयांमध्ये वर्ग मिळणे दुरापास्त झाले आहे. या विलंबाने नव्या शैक्षणिक वर्षांत अभ्यासक्रम पूर्ण करण्याचा कालावधी आक्रसणार आहे.

करोनोत्तर काळात विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने कुठल्याही अभ्यासक्रमाच्या परीक्षेत एक दिवसाआड पेपर घेणे बंधनकारक केले. त्यामुळे परीक्षांचे वेळापत्रक काहीसे लांबले. तथापि, पत्रकारिता आणि जनसंज्ञापन अभ्यासक्रमाचे वेळापत्रक तयार करताना विद्यापीठाला स्वत:च्या परिपत्रकाचा विसर पडला. या अभ्यासक्रमाच्या एक ऑगस्टपासून परीक्षा सुरू होणाऱ्या परीक्षेत एकही दिवसांचे अंतर ठेवलेले नाही. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रश्नसंचही उपलब्ध केले नाही. परीक्षा सुरू होण्यापूर्वी वेळापत्रक १५ दिवस आधी जाहीर करणे आवश्यक असताना ते केवळ आठ दिवस अगोदर जाहीर केले गेले. अनेक अभ्यासक्रमांच्या परीक्षेच्या वेळेत कपात केली गेली. करोना काळात प्रश्नपत्रिका बहुपर्यायी स्वरूपात होती.

आता दीघरेत्तरी स्वरूपात उत्तरे लिहायची आहेत. तरीदेखील वेळेत कपात केल्याची विद्यार्थ्यांची तक्रार आहे. अनेक पदव्युत्तर अभ्यासक्रम विनाअनुदानित आहेत. नवीन शैक्षणिक वर्ष विलंबाने सुरू होणार असल्याने पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमात तासिका तत्त्वावर कार्यरत प्राध्यापकांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.

मुळात अनेक अभ्यासक्रमांचे शैक्षणिक सत्र उशिराने सुरू झाले होते. यूजीसीच्या निकषानुसार त्यांना ९० दिवस द्यावे लागतात. त्यामुळे त्यांची परीक्षा पुढे गेली. पदवीच्या कला व विज्ञान शाखेत एकूण ४७ उपगट आहेत. द्वितीय वर्षांपासून मराठी, हिंदूी, इंग्रजी व उर्दू वेगळे गट आहेत. काही ठिकाणी तीन पेपर सामाईक तर चार पेपर वेगळे आहेत. विद्यापीठाच्या परीक्षा दरवर्षी दोन ते अडीच महिने चालतात. त्यात नवीन काही नाही. यूजीसीच्या सूचनेनुसार नवीन वर्षांचे शैक्षणिक वर्षांचे सत्र एक ऑक्टोबरला सुरू करायचे आहे. तत्पूर्वी परीक्षांचे नियोजन केले गेले. मध्यंतरी चार दिवस प्रवेश परीक्षा होत्या. त्या काळात अंतिम वर्षांची एकही परीक्षा घेता आली नाही. ऑगस्ट, सप्टेंबर या कालावधीत १५ दिवस राष्ट्रीय सुट्टय़ा आहेत. सर्व तांत्रिक बाबी लक्षात घेऊन वेळापत्रक तयार करावे लागते. हा अधिकार मंडळाचा निर्णय आहे. विद्यापीठ पूर्ण क्षमतेने सर्व अभ्यासक्रमांची परीक्षा घेत आहे. प्रत्यक्ष परीक्षा प्रक्रिया विद्यापीठाने रुळावर आणली. कला व विज्ञान शाखेचे पेपर केवळ दोन तास असतात. त्यामुळे पदवी प्रथम वर्षांचे सत्र महाविद्यालयांनी कुठलीही कारणे न देता उपलब्ध साधन सामग्रीने आपल्या पातळीवर सुरू करावे.

– डॉ. महेश काकडे (संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ)