मालेगाव : मालेगाव महापालिका हद्दीत ३० हजारावर बनावट मतदारांची नावे घुसडण्यात आली असून विशिष्ट लोकांच्या राजकीय भल्यासाठी ही नावे वगळली जात नसल्याचा आरोप महापालिका आयुक्त रवींद्र जाधव यांना भेटलेल्या एका शिष्टमंडळाने केला आहे. आगामी महापालिका निवडणुकीपूर्वी ही बनावट नावे वगळण्यात यावी, असे साकडे शिष्टमंडळाने यावेळी आयुक्तांना घातले.

लोकसभा तसेच गेल्या निवडणुकीच्या वेळी मालेगाव मध्य व बाह्य विधानसभा मतदार संघांतील अनेक मतदार याद्यांमध्ये बनावट मतदार असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. अनेक मृत मतदारांची नावे वगळण्यात आली नाहीत. काही मतदारांची नावे दुबार व तिबार देखील आढळून आली होती. काही मतदारांची नावे मालेगाव मध्य व बाह्य या शेजारी असलेल्या दोन्ही मतदार संघांमध्ये समाविष्ट आहेत. अशा स्वरूपाच्या तक्रारीनुसार सर्व नावे वगळणे अपेक्षित असताना अत्यंत अल्प प्रमाणातील नावे वगळण्यात आली, याबद्दल शिष्टमंडळाने आक्षेप नोंदवला आहे.

माजी खासदार डॉ.सुभाष भामरे, बारा बलुतेदार मित्र मंडळाचे संस्थापक बंडूकाका बच्छाव, माजी आमदार आसिफ शेख आदींनी मतदार याद्यांमधील बनावट नावांवर बोट ठेवले होते. या तक्रारींचे अद्याप निरसन झालेले नाही. तरीदेखील आगामी महापालिका निवडणुकीत याच याद्या वापरण्याची प्रशासकीय पातळीवरून तयारी सुरू असल्याबद्दल शिष्टमंडळाने आश्चर्य व्यक्त केले. तसेच प्रशासनाच्या या कृतीला तीव्र हरकत घेतली. सदोष मतदार याद्यांच्या आधारे मतदान झाल्यास निकोप लोकशाहीच्या दृष्टीने ते चुकीचे ठरेल, त्यामुळे निवडणुकीपूर्वी या सर्व याद्या दुरुस्त करण्यात याव्यात, असा आग्रह शिष्टमंडळाने धरला. विशिष्ट राजकीय व्यक्तींना निवडणुकीत फायदा व्हावा म्हणून या याद्या दुरुस्त केल्या जात नाही आणि त्यासाठी प्रशासनावर राजकीय दबाव असल्याचा आरोपही शिष्टमंडळाने केला आहे. शिष्टमडळात गुलाब पगारे, निखिल पवार, मदन गायकवाड, दीपक भोसले, सोमा गवळी, प्रविण सोनवणे, निसार शेख, राजु अहिरे, तुषार ढिवरे, सुरेश गवळी, राजेंद्र शेलार, विवेक वारुळे यांचा समावेश होता.

महापालिकेत एकूण २१ प्रभाग आहेत. त्यातील एकट्या आठ क्रमांकाच्या प्रभागात पाच हजारावर दुबार मतदारांची नावे आहेत. दुबार नावे शोधण्यासाठी सद्यःस्थितीत सॉफ्टवेअर उपलब्ध आहे. त्याच्या आधारे ही नावे वगळण्याची प्रक्रिया अत्यंत सुलभ झाली आहे. तरी देखील प्रशासकीय पातळीवरून तसे करण्याबद्दल उदासीनता का दाखवली जात आहे, हा खरा प्रश्न आहे. निखिल पवार (निमंत्रक आम्ही मालेगाव विधायक संघर्ष समिती. मालेगाव