धुळे – पॅलेस्टाईनवर हल्ला करणाऱ्या इस्रायलचा निषेध करुन सोमवारी जमीयत उलेमा (अर्शद मदनी) या संघटनेच्या वतीने निदर्शने करण्यात आली. शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांना निवेदन देत भारताने पॅलेस्टाईनला मदत करावी, अशी मागणी  करण्यात आली.भारताने नेहमी जगात शांती आणि सौहार्दपूर्ण तसेच अहिंसेचा संदेश दिला आहे. भारत हा देश कायम शांतीसाठी प्रयत्नशील राहिला आहे. पॅलेस्टाईन आणि इस्रायल युद्धात हजारो निष्पाप नागरिकांचा बळी जात आहे. हजारो घरे, शाळा, दवाखाने उदध्वस्त झाले आहेत. एक लाखाहून अधिक लोक बेघर झाले आहेत. शुद्ध पाणी, अन्न, औषधे, उपचार यासाठी नागरिक बेजार झाले आहेत. जवळपास १० लाख नागरिकांना युद्धाची झळ बसली आहे.

या पार्श्वभूमीवर जमीयत उलेमाच्या धुळे शाखेतर्फे केंद्र सरकारला मदतीचे आवाहन करण्यात आले आहे. कित्येक वर्षांपासून पॅलेस्टाईन आपला मित्र देश राहिला आहे. त्यामुळे पॅलेस्टाईनच्या नागरिकांना मदत आणि सहकार्य करण्याची आपली जबाबदारी आहे. युद्ध बंदीसाठी भारताने प्रयत्न करावे, अशी मागणी निवेदनातून केली आहे. निवेदनावर जमीयत उलेमाचे जिल्हाध्यक्ष हाफिज जुर्रहमान, सचिव मौलाना शकील कासमी, मुस्ताक सुफी, हाजी शव्वाल अन्सारी, शेख परवेज, डॉ. सरफराज अकबर आदींची स्वाक्षरी आहे.