ऐतिहासिक वारसा असलेले गड-किल्ले, पुरातन वास्तू, महल यांचे जतन करण्यासाठी पुरातत्त्व विभाग प्रयत्नशील आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्य़ातील कामांनी वेग घेतला असला तरी मिळणारा निधी आणि उपरोक्त कामांवर होणारा खर्च यांचा ताळमेळ बसविताना या विभागाला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.
इतिहासप्रेमी, पर्यावरणप्रेमी यांच्याकडून जिल्ह्य़ातील गड-किल्ल्यांची दुरवस्थेवर बोट ठेवत समृद्ध परंपरा लाभलेल्या ऐतिहासिक वास्तूंचे जतन व्हावे, अशी मागणी अव्याहतपणे सुरू आहे. याकडे पुरातत्त्व विभागाचे दुर्लक्ष ही नित्याची तक्रार राहिली आहे. या स्वरूपाचे काम प्रस्तावित करताना पुरातत्त्व विभागासमोर त्या कामांसाठी संबंधित विभागाची मान्यता मिळवणे, त्यासाठी निधी मंजूर करून घेणे, प्रत्यक्ष कामास सुरुवात करणे अशी अडथळ्यांची शर्यत पार पाडावी लागते.
जिल्ह्य़ात सद्य:स्थितीत नाशिक शहरातील सुंदर नारायण मंदिर, चांदवड येथील रेणुका माता मंदिर, चांदवड येथील होळकर वंशजाचा रंगमहाल यासह मालेगाव तालुक्यातील डोंगरी किल्ला, अंकाई-टंकाईच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यातील चांदवडच्या रेणुका माता मंदिराचे काम अंतिम टप्प्यात असून रंगमहालाचे काम प्रगतिपथावर आहे. या कामासाठी सरकारकडून तीन कोटींहून अधिक निधी प्राप्त झाला होता. प्रत्यक्षात तो अपुरा ठरला.
गड-किल्ला परिसरात दुरुस्ती करताना गडाचा बुरूज, संरक्षक भिंतीची दुरुस्ती करताना वापरण्यात येणारा दगड, तो वर चढविण्यासाठी येणारा खर्च, मजुरी तसेच त्यामध्ये पुरातन शैलीच्या दृष्टीने अपेक्षित काम करू शकतील, असे कारागीर शोधणे अडचणीचे ठरते. भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या रेणुका माता मंदिराला गतवैभव मिळवून देताना अशाच अडचणींना तोंड द्यावे लागले. हे सर्व काम चुन्याच्या मदतीने होत असल्याने वेळखाऊ प्रक्रियेमुळे ती रेंगाळली आहे. यामुळे या कामाची किंमत वाढत असताना सरकारदरबारी मात्र याबाबत कमालीची अनास्था अनुभवयास मिळत असल्याची तक्रार खुद्द पुरातत्त्व विभागातील अधिकाऱ्यांनी केली.