‘पर्वणी’वर मेघराजाची बरसातखास 
शाही मिरवणूक आणि स्नानास पावसाची मुसळधार हजेरी.. रामकुंड परिसरात तासभर ताटकळावे लागल्याने दिगंबर आणि निर्माही आखाडय़ांच्या महंतांचा झालेला संताप.. महंतांची समजूत काढताना प्रशासनाची झालेली केविलवाणी अवस्था.. अखेरची पर्वणी आणि त्यातच ऋषिपंचमी असल्याने भर पावसात भाविकांची उसळलेली गर्दी..नारोशंकर मंदिरालगतच्या पटांगणावर साधू-महंतांच्या मोटारी आणि भाविकांच्या गर्दीमुळे उडालेला गोंधळ..
कुंभमेळ्यातील तिसरी शाही पर्वणी शुक्रवारी काही वाद-विवादांचा अपवाद वगळता येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. दिवसभर संततधारेमुळे स्नानासाठी आलेल्या भाविकांसह बंदोबस्तावरील पोलीस व गृहरक्षक दलाच्या जवानांचे कमालीचे हाल झाले. पावसामुळे मिरवणूक कुठेही रेंगाळली नाही. स्नानानंतर परतताना आखाडय़ांची क्रमवारी बदलणार होती. त्याचा लाभ उठवत भाविकांनी थेट रामकुंडावर घुसखोरी करत स्नानाचा आनंद लुटल्याचे पहावयास मिळाले.
जगातील सर्वात मोठा उत्सव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुंभमेळ्यातील येथील अखेरच्या शाही पर्वणीचा दिवस मुसळधार पावसाने गाजवला. पहाटे चारपासून विजांच्या कडकडाटात मुसळधार पावसाला सुरूवात झाली. त्यामुळे वेळेत मिरवणूक सुरू होईल की नाही, याबद्दल साशंकता व्यक्त केली जात होती. परंतु, नियोजित वेळेत सकाळी सहा वाजता मिरवणुकीला सुरूवात झाली. निर्मोही, दिगंबर आणि निर्वाणी असा मिरवणुकीला रामकुंडावर जाताना क्रम होता. पावसात ढोल-ताशांचा गजर, बँड पथक, पारंपरिक शस्त्रास्त्रांद्वारे साहसी खेळांचे प्रदर्शन साधुंकडून करण्यात आले. याआधीच्या पर्वणीच्या तुलनेत मिरवणुकीतील रथांची संख्या कमालीची घटली. काही महंतांनी रस्त्यावरून पायीच रामकुंडावर जाणे पसंत केले. शाही मार्गावरील बराचसा भाग काहिसा उताराचा आहे. त्यामुळे बहुतांश ठिकाणी पावसाचे पाणी वाहत होते. साधुंनी ढोलच्या तालावर नाचण्याची हौस पूर्ण केली. मिरवणुकीत परप्रांतीय भाविकांची संख्या अधिक होती.
गाडगे महाराज पुलाखालील सखल भागात पावसाचे पाणी साचल्याने पालिकेच्या वतीने ते उपसण्यासाठी पंपाचा आधार घेण्यात आला. महंतांची वाहने नारोशंकर मंदिरालगतच्या पटांगणावर थांबविण्यात आली. मिरवणुकीत भाविक मोठय़ा संख्येने सहभागी झाल्याने परिसरात ही वाहने आणि भाविकांची एकच गर्दी झाली. मुख्य रस्त्यावरून गोदा काठालगतच्या पटांगणात उतरण्याच्या मार्गाचा काही भाग तीव्र उताराचा आहे. खालशांच्या वाहनात शेकडो भाविकही बसल्याने उतारावर वाहनांची विचित्र स्थिती निर्माण होत होती. चढावरून वर जाणारे वाहन मागे परत येणे आणि उतरणारे वाहन अकस्मात समोर येत असल्याने भाविकांची तारांबळ उडत होती.
पावसामुळे पटांगणात फारसे पोलीसही नव्हते. दीड ते दोन तास हा गोंधळ परिसरात सुरू होता. पावसामुळे भाविक व पोलीस यंत्रणेला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले.
काही पोलिसांकडे बचावासाठी जॅकेट असले तरी काहींकडे ते नसल्याने त्यांना भिजतच आपले कर्तव्य पार पाडावे लागले. महिला कर्मचाऱ्यांची स्थिती अधिकच बिकट होती. रामकुंड परिसरात महिला पोलिसांची संख्या कमी असल्याने स्नानानंतर महिलांना बाहेर काढण्याचे कामही बहुतांश प्रमाणात पुरूष कर्मचाऱ्यांनाच करावे लागले.
पालकमंत्री गिरीश महाजन आणि पोलीस आयुक्त एस. जगन्नाथन हे स्वत: काहीवेळ भाविकांना कुंडाबाहेर काढण्याचे काम करत असल्याचे पाहावयास मिळाले.

‘सनातन’चे फलक गायब
कुंभमेळ्यात याआधीच्या दोन पर्वणीत भाविकांच्या स्वागतासाठी साधुग्राम ते रामकुंडापर्यंत फलक घेऊन सक्रिय राहिलेले सनातन संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्ते शुक्रवारी गायब झाल्याचे पाहावयास मिळाले.
कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणी सांगली पोलिसांनी सनातन संस्थेचा कार्यकर्ता समीर गायकवाडला अटक केल्याच्या पाश्र्वभूमीवर, विरोधी पक्षांनी या संस्थेवर बंदी घालण्याची मागणी केली आहे.

दोन ते तीन दिवसात घडलेल्या घडामोडींचा धसका स्थानिक पातळीवर सिहस्थात सहभागी झालेल्या स्थानिक कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी घेतला. पहिल्या व दुसऱ्या शाही पर्वणीत या संस्थेचे कार्यकर्ते ठिकठिकाणी फलक हाती घेऊन ‘हिंदू धर्माभिमान्यांचे स्वागत’ करत होते. परंतु, तिसऱ्या पर्वणीत बहुतांश फलक अंतर्धान पावले. गोदाकाठावरील या संस्थेच्या कार्यालयाबाहेर एक फलक झळकत होता. परंतु, गोदा घाटांवर मात्र त्यांचे कोणी दृष्टिपथास पडले नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महंतांचा संताप
शाही मिरवणुकीस रामकुंडावर येताना निर्माही, दिगंबर, निर्वाणी असा क्रम होता. स्नानानंतर हा क्रम बदलणार होता. पहिल्या दोन्ही आखाडय़ांचे निशाण व प्रमुख महंतांना थांबण्यासाठी रामकुंडालगतच्या पटांगणात बैठक व्यवस्थाही करण्यात आली. तथापि, निर्मोही व दिगंबर आखाडय़ाचे प्रमुख महंत रामकुंडावर आल्यानंतर त्यांना स्नानाआधी या ठिकाणी बसविण्यात आले. दरम्यानच्या काळात त्यांच्या आखाडय़ाशी संलग्न खालशांनी स्नान करून परतीचा मार्ग धरला. या प्रकाराने संतप्त झालेल्या महंतांनी अंतिम क्षणी स्नानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. पोलीस आयुक्त एस. जगन्नाथन, जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, महसूल आयुक्त एकनाथ डवले यांच्यासह सर्व जण संबंधितांची समजूत काढण्यासाठी धडकले. उपजिल्हाधिकारी महेश पाटील यांनी पुन्हा एकदा गुफ्तगू केल्यावर महंतांचा रोष कमी झाला. यावेळी पालकमंत्री गिरीश महाजन यांनीही मध्यस्थी केली. निर्वाणी आखाडय़ाचे महंत ग्यानदास व संबंधितांची इतरांना नाहक प्रतीक्षा करावी लागली. स्नान झाल्यावर प्रतीक्षा करणे वेगळे आणि स्नान न करता प्रतीक्षा करणे वेगळे, असे त्यांचे म्हणणे होते. प्रशासनाच्या मध्यस्थीनंतर या वादावर पडदा पडला. त्यानंतर उपरोक्त आखाडय़ांचे महंत स्नानासाठी तयार झाले. यावेळी महंतांनी सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना पुष्पहार घातले. निर्वाणी आखाडय़ाचे महंत ग्यानदास महाराज यांच्यासह साधू-महंत साधुग्रामकडे रवाना झाले. परतताना निर्वाणीनंतर दिगंबर, निर्मोही असे निशाण मार्गस्थ झाले.