नाशिक : बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी श्रावण महिन्यात दररोज भाविकांची गर्दी ओसंडून वाहत असते. त्यातच श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी त्र्यंबकेश्वरजवळील ब्रम्हगिरी पर्वताला प्रदक्षिणा करण्यासाठी देशभरातून हजारो भाविक येताक. ही प्रदक्षिणा कशी पूर्ण करावी, याचे एक शास्त्र आहे. प्रदक्षिणेचा मार्गही ठरलेला असतो. ११ ऑगस्ट रोजीच्या तिसऱ्या श्रावणी सोमवारी भाविकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिर दर्शनासाठी देशभरातून हजारो भाविक येत असतात. श्रावणात चारही सोमवारी ब्रह्मगिरी प्रदक्षिणा केली जात असली तरी तिसऱ्या सोमवारच्या प्रदक्षिणेला धार्मिकदृष्ट्या अधिक महत्व प्राप्त झाले आहे. सुमारे आठशे वर्षांपूर्वी संत निवृत्तीनाथ महाराज ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा करत असताना योगीराज गहिनीनाथांचा अनुग्रह लाभला.
आणि त्यांनी भागवत धर्माची स्थापना केली, असे म्हटले जाते. तेव्हापासून श्रावणात ब्रम्हगिरी प्रदक्षिणा रुढ झाल्याचे सांगण्यात येते. ब्रह्मगिरी, हरिहर- ब्रह्मगिरी आणि इंद्रपर्वतसह (अंजनेरी पर्वत) ब्रह्मगिरी अशा तीन वेगवेगळ्या अंतराच्या प्रदक्षिणा आहेत. बहुसंख्य भाविक २० किलोमीटरची प्रदक्षिणा करतात. मार्गावर प्रयागतीर्थ, सरस्वती तीर्थ, नागातीर्थ, रामतीर्थ, वैतरणा-बाणगंगा निर्मलतीर्थ, बानगंगा-धवलगंगा पद्मतीर्थ, नरसिह तीर्थ, बिल्वतीर्थ आणि काही नद्या लागतात.
रविवारी रात्री किंवा पहाटेपासून प्रदक्षिणेला सुरुवात
श्रावणी सोमवारच्या आदल्या रात्री म्हणजे रविवारी किंवा सोमवारी भल्या पहाटे प्रदक्षिणेला सुरुवात केली जाते. त्र्यंबकेश्वरमधील कुशावर्त तीर्थात स्नान करुन प्रदक्षिणेचा प्रारंभ होतो. कुशावर्तापासून निघाल्यानंतर नाशिकच्या दिशेने त्र्यंबकेश्वरपासून जवळच असलेल्या प्रयागतीर्थ कुंडाला प्रदक्षिणा करुन घोटी मार्गाने पहिनेच्या दिशेने जावे लागते. बहुसंख्य भाविक अनवाणीच असतात.
पहिन्यापासून तासाभरानंतर उजवीकडील जाणाऱ्या रस्त्यावर भिलमाळ हे गाव लागते.त्यानंतर धाडोशीपासून पुढे ग्लायवर मुख्य रस्ता सोडून उजव्या बाजूला सिमेंटच्या रस्त्याने पुढे जावे लागते. या रस्त्याने पुढे गेल्यावर घाटात गौतम ऋषी यांचे मंदिर लागते. पुढे काही सपाटीचा भाग लागतो. पुढे डोंगर उतरुन डांबरी रस्ता लागतो.
तळेगाव, सापगाव आले की समजावे, प्रदक्षिणेचा शेवट जवळ आला. त्र्यंबकेश्वर- जव्हार मार्गावरील ही गावे आहेत. डांबरी रस्त्याने भाविक त्र्यंबकेश्वरच्या दिशेने मार्गक्रमण करतात. प्रदक्षिणेचा बराचसा भाग हा मातीच्या रस्त्याने होतो. आणि त्यानंतर शेवटाला पुन्हा पाय जेव्हा डांबरी रस्त्याला लागतात. तेव्हा, तळपाय रस्त्यावरील बारीक खड्ड्यांचे टोचणेही सहन करु शकत नाहीत इतके हुळहुळे झालेले असतात.
गौतमबारी पार केल्यानंतर त्र्यंबकेश्वर शहराचे दर्शन होते. गौतमबारीपासून अर्ध्या तासानंतर भाविक त्र्यंबकेश्वर शहरात दाखल होतात. कुशावर्तात जाऊन हातपाय धुतल्यानंतर प्रदक्षिणा पूर्ण होते. श्रावणात बहरलेल्या निसर्गाचा आनंद घेत प्रदक्षिणा करणे म्हणजे एक अपूर्व समाधानाचा ठेवा म्हणावा लागेल.
प्रदक्षिणा सुरु केल्यानंतर काही ठिकाणी विशेषत: तिसऱ्या सोमवारी सामाजिक संस्थांकडून अल्पोहाराची व्यवस्था केली जाते. स्थानिक मंडळींकडूनही चहाची छोटी दुकाने प्रदक्षिणा मार्गावर थाटली जातात. निसर्गासह धार्मिकतेचा आनंद घेण्याची इच्छा असणाऱ्यांनी एकदा तरी ब्रम्हगिरी प्रदक्षिणा करावीच. त्र्श्बकेश्वर परिसर किती प्रकारच्या झाडाझुडपांनी भरलेला आहे, त्याचे दर्शन होते.