धुळे – संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेल्या धुळे येथील गुलमोहर शासकीय विश्रामगृहातील एक कोटी ८४ लाख ८४ हजार २०० रुपयांच्या रोकड प्रकरणी अखेर खंडणी गोळा केल्याचा दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विधिमंडळ अंदाज समिती धुळे दौऱ्यावर असताना २१ मे रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास धुळ्यातील गुलमोहर शासकीय विश्रामगृहाच्या एका कक्षात (क्र. १०२) एक कोटी ८४ लाख ८४ हजार २०० रुपये आढळले होते.
ही रक्कम विधिमंडळ अंदाज समितीच्या सदस्यांना देण्यासाठी जमा करण्यात आल्याचा आरोप करीत शिवसेनेचे (उध्दव ठाकरे) माजी आमदार अनिल गोटे यांनी संबंधित खोलीची तपासणी करून त्यातील रक्कम ताब्यात घ्यावी, कायदेशीर कारवाई करावी, या मागणीसाठी विश्रामगृहातच ठिय्या दिला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संपूर्ण प्रकरणाची विशेष पथकामार्फत चौकशी करण्यात येईल, असे जाहीर केले होते.
पोलिसांनी या प्रकरणी जाणीवपूर्वक अदखलपात्र गुन्हा दाखल केल्याचा आरोप करुन अनिल गोटे यांनी न्यायालयात धाव घेतली. हे प्रकरण गंभीर असतांना पोलीस अधिकाऱ्यांनी अदखलपात्र म्हणून हाताळलेच कसे, असा गोटे यांचा प्रश्न होता. याविरोधात जिल्हा न्यायालयात दाद मागत गोटे यांनी खंडणीच्या कलमासह दखलपात्र गुन्हा दाखल करावा,अशी मागणी केली होती.
न्यायालयात याप्रकरणी गोटे यांनी स्वतः युक्तिवाद केला. या पार्श्वभूमीवर विविध कलमांसह भारतीय न्याय संहितेच्या कलम ६१ (२), २३३, २३८, २३९, २४१, २४९ नुसार दखलपात्र गुन्ह्याची नोंद करावी,असा आदेश प्रथमवर्ग न्याय दंडाधिकाऱ्यांनी गुरुवारी दिला. त्यानंतर शहर पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री अकरानंतर विधिमंडळाच्या अंदाज समिती अध्यक्ष अर्जुन खोतकर यांचा कथित स्वीय सहायक किशोर पाटील, वाहनचालक राजकुमार मोगले यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम हाती घेण्यात आले.
मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाने १० जुलै रोजी दिलेल्या आदेशात केवळ भारतीय न्यायसंहितेतील कलमांचा उल्लेख केला आहे. आर्थिक गैरव्यवहार (मनी लाँडरिंग) आणि लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याचा उल्लेख नाही. कारण यात तपासाचे अधिकार पोलिसांना नाहीत, असे पोलिसांतर्फे न्यायालयात सांगण्यात आले होते. याअनुषंगाने आधी झालेल्या न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती मिळाली होती. यानंतर पुन्हा योग्य आणि स्पष्ट आदेशासाठी कामकाज झाले.
या नव्या आदेशानंतर धुळे शहर पोलीस ठाण्यात न्यायालयाने दिलेल्या आदेशातील कलमान्वये किशोर पाटील आणि राजकुमार मोगले यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली.
दाखल झालेल्या गुन्ह्यात प्रामुख्याने कलम ३०८ म्हणजे खंडणी, एखाद्या व्यक्तीला इजा करण्याची भीती दाखवून किंवा इतर कोणत्याही प्रकारे दबाव आणून त्याच्याकडून जबरदस्तीने काही मालमत्ता (जसे पैसे किंवा इतर मौल्यवान वस्तू) घेण्याचा प्रयत्न करणे होय. कलम २३३ अंतर्गत पुरावा खोटा असल्याचे माहीत असूनही तो खरा असल्याचे भासवून त्याचा वापर करणे किंवा वापर करण्याचा प्रयत्न करणे, तसेच कलम २४१ अंतर्गत पुरावा म्हणून सादर होण्यापासून रोखण्यासाठी कागदपत्रे नष्ट करणे, लपविणे किंवा बदलणे असे स्पष्ट करण्यात आले आहे.
यापूर्वी दाखल असलेल्या आदखलपात्र गुन्ह्याचा तपास या नवीन गुन्ह्यामधे समाविष्ट करून तपास करण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. या गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे हे करणार आहेत.