धुळे : जिल्ह्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था मजबूत ठेवण्यासाठी धुळे पोलिसांनी मोठी कारवाई करत एकाच वेळी २१९ सराईत गुन्हेगारांची झाडाझडती घेतली.

२ डिसेंबर २०२५ रोजी शिरपूर, शिंदखेडा, दोंडाईचा आणि पिंपळनेर नगरपरिषद व नगरपालिकांच्या निवडणुका पार पडणार असून ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. संभाव्य गुन्हेगारी हालचाली रोखण्यासाठी पोलिसांनी १५ नोव्हेंबर २०२५ रोजी पहाटेपासून जिल्ह्यात एकत्रित शोधमोहीम राबवली.

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या या कारवाईत सर्व पोलीस ठाण्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील घरफोडी, चोरी, वाहनचोरी आणि शरीराविरुद्ध गुन्हे करणारे रेकॉर्डवरील गुन्हेगार ओळखून त्यांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आणले. सर्व गुन्हेगारांची माहिती आणि छायाचित्रांसह अर्ज भरून घेण्यात आले. या मोहिमेत २९ घरफोडी, ३७ चोरी, १९ वाहनचोरी आणि १३४ शरीराविरुद्ध गुन्ह्यांमध्ये सामील असलेल्या सराईत गुन्हेगारांसह एकूण २१९ जणांची तपासणी करण्यात आली.

निवडणुकांच्या काळात शांतता अबाधित राहावी म्हणून या सर्वांवर नियमित लक्ष ठेवण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. ही कारवाई निवडणूक काळातील संभाव्य धोक्यांचे मूल्यांकन करण्यासाठी आणि गुन्हेगारीचा आढावा घेण्यासाठी महत्वपूर्ण ठरणार असल्याचे पोलीस अधीक्षक धिवरे यांनी सांगितले. या मोहिमेत अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलिस अधिकारी सुनिल गोसावी, राजकुमार उपासे, संजय बावळे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक श्रीराम पवार आणि सर्व पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांनी व्यापक सहभाग घेतला.

‘ऑपरेशन शोध-२’ मोहिमेत मोठी कामगिरी

दरम्यान, धुळे पोलिसांनी ‘ऑपरेशन शोध-२’ या राज्यस्तरीय मोहिमेतही मोठे यश मिळवले आहे. महिला व बाल अपराध प्रतिबंध विभागाच्या निर्देशानुसार १ ते १५ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत अपहृत मुलांच्या शोधासाठी विशेष मोहीम राबवण्यात आली. धुळे जिल्ह्यातील संयुक्त पथकांनी गुजरातमधील पालसाना, मध्यप्रदेशातील सेंधवा, नेपाळ सीमेवरील मोगलाह, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत शोधमोहीम राबवली. या मोहिमेत १८ वर्षांखालील १९ मुले आणि १५१ मुलींचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले. तसेच जिल्ह्यात हरवलेल्या ५७० महिलांचा आणि ३०५ पुरुषांचा शोध घेऊन त्यांना सुरक्षितपणे त्यांच्या कुटुंबांकडे सुपूर्द करण्यात आले. धुळे पोलिसांच्या या दोन्ही कारवाया जिल्ह्यातील सुरक्षेची भावना बळकट करणाऱ्या ठरल्या आहेत.