शहरात कपातीच्या मुद्यावरून सुरू असलेले कवित्व अद्याप सुरू असून छुप्या कपातीवरून रणकंदन उडाल्यावर गुरूवारी महापौरांनी बोलाविलेल्या बैठकीत या संदर्भात पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या समवेत पुढील आठवडय़ात बैठक घेण्याचे निश्चित झाले. वाढीव पाणी देऊनही २६ दिवस पाणी कमी पडणार असल्याने पालिकेला आणखी २०० ते २५० दशलक्ष घनफूट पाणी द्यावे, अशी मागणी पालकमंत्र्याकडे करण्यात येणार आहे. भाजपच्या आमदारांनी त्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. एकंदर धरणात पुरेसे पाणी आहे असे सांगणाऱ्या भाजपला वास्तव स्थिती मान्य झाल्याचे अधोरेखीत झाले आहे. शहरासाठी आरक्षित केलेल्या पाण्यात नेहमीच्या तुलनेत बरीच कपात झाल्यामुळे महापालिकेतील सत्ताधारी मनसेने आठवडय़ातील एक दिवस पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. तथापि, पुरेसे पाणी असल्याने पाणी पुरवठा बंद ठेवण्याची गरज नसल्याचे पत्र पालकमंत्र्यांनी दिले. परिणामी, पालिका प्रशासनाने सत्ताधाऱ्यांच्या निर्णयाची अंमलबजावणी केली नाही. महिनाभर हा विषय अधांतरी राहिल्यावर महाजन यांनी ३०० दशलक्ष घनफूट जादा पाणी महापालिकेला उपलब्ध केले. तथापि, त्यातूनही २६ दिवस पाणी कमी पडणार असल्याचे समोर आले. याच काळात पाणी पुरवठा विभागाने छुपी कपात सुरू करत सर्वाना अंधारात ठेवले. या घडामोडींच्या पाश्र्वभूमीवर गुरूवारी आयोजित बैठकीत चर्चेपलीकडे फारसे काही निष्पन्न झाले नाही. पाणी पुरवठा विभागाने उपरोक्त दिवस पाणी कमी पडणार असल्याची कबुली दिली आहे. महापौर अशोक मुर्तडक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस भाजपचे आ. प्रा. देवयानी फरांदे, सीमा हिरे, बाळासाहेब सानप उपस्थित होते. या संदर्भात पालकमंत्री महाजन यांच्यासमवेत संयुक्त बैठक होणे आवश्यक आहे. दोन-तीन वेळा नियोजित बैठक पुढे ढकलली गेल्याचा मुद्दा पुढे आला. त्यावर भाजप आमदारांनी पुढील आठवडय़ात ही बैठक बोलावण्याचे मान्य केले. जलसंपदा विभागाने २०० ते २५० दशलक्ष घनफूट जादा पाणी उपलब्ध केल्यास वाढीव कपातीचा मुद्दा राहणार नाही. हे पाणी उपलब्ध व्हावे म्हणून प्रयत्न करण्याचे भाजप आमदारांनी मान्य केले.