जळगाव – जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाला (विकास) पावसाळ्यात संकलन घटल्यानंतर मागणी आणि पुरवठा यांचा समन्वय साधताना, सध्या तारेवरची कसरत करावी लागत आहे. या पार्श्वभूमीवर, संघाने बुधवारपासून गाय दूध खरेदीदरात प्रति लिटर एक रूपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे जिल्ह्यातील पशुपालक शेतकऱ्यांना काहीअंशी दिलासा मिळणार असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.
पावसाळ्यात दूध संकलन कमी होण्याचे मुख्य कारण म्हणजे पुरेशा पोषक चाऱ्याचा अभाव. ज्यामुळे दुधाळ जनावरांचे दूध उत्पादन बऱ्याच प्रमाणात घटते. या शिवाय, सततचा पाऊस किंवा अतिवृष्टीमुळे पशुधनावर ताण येतो. गोठ्यातील ओलाव्यामुळे डास आणि माशांचे प्रमाण वाढून संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव होतो. यापेक्षा वेगळी परिस्थिती सध्या जिल्ह्यात नसताना जळगाव जिल्हा सहकारी संघाच्या दैनंदिन दूध संकलनावर त्याचा विपरीत परिणाम झाल्याचे दिसून आले आहे. सद्यःस्थितीत जळगाव दूध संघाचे दैनंदिन संकलन सुमारे दोन लाख १० हजार लिटरपर्यंत असून, त्या पैकी गायीचे दूध एक लाख ६० हजार लिटर आणि म्हशीचे दूध ५० हजार लिटरपर्यंत आहे.
दरम्यान, जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने बुधवारपासून गायीच्या दूध खरेदीदरात एक रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी, पशुपालक शेतकऱ्यांना आता ३.५ फॅट (स्निग्धांश) आणि ८.५ टक्के एसएनएफ (स्निग्धेतर घटक) दर्जाच्या दुधाला प्रति लिटर ३५ रूपये खरेदीदर मिळणार आहे. त्यानुसार दूध उत्पादक शेतकऱ्यांना नवीन खरेदीदर अदा करण्यात यावे, असे गावोगावच्या प्राथमिक सहकारी दूध उत्पादक संस्थांना जिल्हा सहकारी संघाकडून सूचित करण्यात आले आहे. या संदर्भात अधिकृत दर पत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील हजारो दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. खरेदीदरातील वाढ सणासुदीच्या काळात त्यांच्यामध्ये चैतन्य निर्माण करेल, असेही दूध संघाच्या प्रशासनाने म्हटले आहे.
म्हशीच्या दुधाचे दर जैसे थे
जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने गायीच्या दुधाचे खरेदीदर वाढवले असले, तरी म्हशीच्या दुधाचे खरेदीदर मात्र जैसे थे ठेवले आहेत. गेल्या २१ तारखेला म्हशीच्या दुधाचे खरेदीदर प्रति लिटर १५ पैशांनी वाढवण्यात आले होते. त्यामुळे गायीच्या दुधासोबत या वेळी म्हशीच्या दुधाचे खरेदीदर वाढवण्यात आलेले नाहीत. सध्या म्हशीच्या ६.० फॅट (स्निग्धांश) आणि ९.० टक्के एसएनएफ (स्निग्धेतर घटक) दर्जाच्या दुधाला प्रति लिटर आठ रूपये २५ पैसे खरेदीदर दिला जात आहे, असे जिल्हा दूध संघातील संकलन विभागाच्या सूत्रांनी सांगितले.