अनाथांची काळजी घेण्याची जबाबदारी

नाशिक : सद्य:स्थितीत करोनाचा वाढलेला संसर्ग आणि त्यामुळे बाधित रुग्णांच्या मृत्यूचे वाढलेले प्रमाण विचारात घेता त्याचा बालकांच्या जीवनावरदेखील गंभीर परिणाम होत आहे. करोनामुळे पालकांचे निधन झाल्याने अनाथ झालेल्या मुलांची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. बालकांची काळजी घेणारे कोणीही नसल्याने ही बालके शोषणास बळी पडण्याची तसेच बाल कामगार किंवा मुलांची तस्करीसारख्या गुन्ह्यंमध्ये ओढली जाण्याची शक्यता विचारात घेऊन त्यांची काळजी व संरक्षणासाठी जिल्हा पातळीवर कृती दल स्थापन करण्यात आले  असल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली.

जिल्हाधिकारी मांढरे यांच्या अध्यक्षतेखाली बालकांची काळजी व संरक्षणासाठी स्थापन करण्यात आलेल्या कृती दलाच्या बैठकीचे दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील, जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाचे न्यायमूर्ती प्रसाद कुलकर्णी, नाशिक महानगरपालिकेच्या उपायुक्त अर्चना तांबे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल कीसआहेर, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किशोर श्रीवास, मालेगाव महानगरपालिकेचे साहाय्यक आयुक्त तुषार आहेर, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी राजेंद्र चौधरी, पोलीस निरीक्षक संगीता निकम, बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा शुभांगी बेळगावकर आदी उपस्थित होते.

करोना संकटात पालक गमावलेली मुले ही बालकामगार, बेकायदेशीर दत्तक वा मानवी तस्करीस बळी पडू नयेत यासाठी तसेच दोन्ही पालक रुग्णालयात दाखल असतील आणि बालकांचा सांभाळ करण्यासाठी कोणी नसेल तर अशा वेळी बालकांची गैरसोय होते. त्यामुळे त्यांना तात्पुरता निवारा तसेच पालकांच्या मृत्यूमुळे अनाथ झालेल्या बालकांचे संपूर्ण संरक्षण, संगोपन व पुनर्वसन करण्याची जबाबदारी जिल्हास्तरीय कृती दलाची आहे. त्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी सतर्कतेने आणि संवेदनशीलरीत्या काम करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी मांढरे यांनी दिल्या.

करोनाच्या तिसऱ्या लाटेचे लहान मुलांवर होणारे संभाव्य परिणाम लक्षात घेता आरोग्य यंत्रणेने शासकीय तसेच खासगी रुग्णालयांच्या समन्वयाने जिल्ह्य़ात लहान मुलांच्या अनुषंगाने करोना उपचार केंद्र आणि आरोग्य कें ंद्राची निर्मिती करावी, तसेच पालकांनीही मुले या तिसऱ्या लाटेत करोना संसर्गाला बळी पडणार नाही याची काळजी घ्यावी, अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी के ली. करोना नियमांचे काटेकोरपणे मुले पालन करतील याकडे पालकांनी अधिक लक्ष द्यावे, त्यांना प्रशिक्षित करावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी मांढरे यांनी केले.

या संस्थांशी संपर्क करावा

करोनामध्ये अनाथ झालेल्या बालकांची माहिती देण्यासाठी २४ तास कार्यरत असणाऱ्या चाइल्डलाइन १०९८ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. त्याचप्रमाणे महिला व बालविकास विभागाची मदतवाहिनी क्रमांक ८३०८९९२२२२/ ७४०००१५५१८, बाल कल्याण समिती नाशिक, ०२५३-२३१४५९८/ ९९२२६१६२८०, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, नाशिक ०२५३-२२३६३६८, जिल्हा बाल संरक्षण कक्ष नाशिक ०२५३-२२३६२९४, समन्वय, जिल्हास्तरीय कृती दल ९७६२३१३१५६ (व्हॉट्सअ‍ॅप) या संपर्क क्रमांकांवर नागरिकांनी माहिती देण्यासाठी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी मांढरे यांनी केले आहे.

अनाथ बालकांच्या पुनर्वसनासाठी संस्था

जिल्ह्यतील शून्य ते सहा वर्षे वयोगटातील मुलांसाठी आधाराश्रम संचालित शिशुगृह घारपुरे घाट  येथील राहुल जाधव ९८३४८३७०४५/ ०२५३-२९५०३००९, सात ते १८ वर्षे वयोगटातील मुलांसाठी निवारा डॉन बॉस्को बॉम्बे सेल्सिअन सोसायटी प्लॉट नं. ७१३८, जी.डी. रोड नाशिक येथील बालगृह अधीक्षक रोशन गोन्सालविस ८४०७९९३६०२/ ७५१७०४१०११ सात ते १८ वर्षे वयोगटातील मुलींसाठी जिल्हा परिवीक्षा आणि अनुरक्षण संघटना संचालित मुलींचे निरीक्षणगृह/ बालगृह उंटवाडी रोड, नाशिक अधीक्षिका सीमा जगदाळे ०२५३-२५८३५९८/ ९८६०२००६०३ तसेच १८ ते २३ वर्षे वयोगटातील मुलींसाठी शासकीय मुलींचे अनुरक्षण गृह, बंगला नं. ५ वसंत बहार सोसायटी, त्रिकोणी गार्डनजवळ, काठे गल्ली, नाशिकच्या अधीक्षिका विनिता सोनगत ७७४४८४६५९१ या संस्थांशी संपर्क साधण्यात यावा.