नाशिक : विद्यार्थ्यांमध्ये योगविषयक जागृती व्हावी, त्यांचे आरोग्य अबाधित रहावे यासाठी केंद्र सरकारचे आयुष मंत्रालय आणि येथील समर्थ ट्रस्ट यांच्या वतीने ‘योग’ यज्ञ ही अभिनव संकल्पना मांडण्याचा प्रयत्न सोमवारी झाला. हा प्रयत्न विद्यार्थ्यांच्या आणि योगप्रेमींच्या संयमाची परीक्षा पाहणारा ठरला. पूर्व नियोजित ठिकाण कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला बदलत कार्यक्रम पंचवटीतील विभागीय क्रीडा संकुलात घेण्यात आला. दुसरीकडे, संयोजकांकडून गर्दी जमविण्याच्या नादात वेळकाढूपणाचे धोरण स्वीकारले गेल्याने उपस्थित विद्यार्थी व योगप्रेमींमध्ये उत्साहाऐवजी अस्वस्थता निर्माण झाली. अखेर या योग यज्ञाचे सोपस्कार पार पडल्यानंतर विद्यार्थ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

येथील छत्रपती शिवाजी स्टेडियम, छत्रपती संभाजी स्टेडियम आणि विभागीय क्रीडा संकुलात सोमवारी सकाळी साडेसहा ते आठ या वेळेत एकाच वेळी परिसरातील वेगवेगळ्या शाळेतील विद्यार्थ्यांनी एकत्रित योगाचे प्रात्यक्षिक व योगसाधना करण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्याकरिता विद्यार्थ्यांची शारीरिक वाढ, तणाव व्यवस्थापन, एकाग्रता यासाठी उपयुक्त ठरतील अशी बैठक, स्तंभ, दंड स्थितीत विविध योग आसनांचा तसेच प्राणायामवर आधारित अभ्यासक्रम तयार करण्यात आला.

नियोजन समितीकडून स्टेडियम परिसराची गरजेनुसार डागडुजी करण्यात आली, परंतु पावसाने हजेरी लावल्यावर आयोजकांच्या नियोजनावर पाणी फिरते की काय अशी स्थिती निर्माण झाल्याने रविवारी रात्री उशीराने पूर्वनियोजित छत्रपती संभाजी स्टेडियम आणि छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर होणारे योग प्रात्यक्षिक रद्द करत सर्व विद्यार्थ्यांना विभागीय क्रीडा संकुलात आणण्याचे ठरविण्यात आले. पूर्वनियोजित वेळेवर विद्यार्थी येण्यास सुरूवात झाली.

शहरातील अन्य स्टेडियमवर टप्प्याटप्प्याने जमा होणाऱ्या विद्यार्थ्यांना एकत्रित करण्याच्या नादात विभागीय संकुलातील कार्यक्रमास विलंब झाला. शहरातील इतर भागांसाठी विभागीय संकुल लांब असल्याने अनेकांचा हिरमोड झाला. कार्यक्रमास अभिनव बालविकास मंदिर, जेम्स, वाघ गुरुजी, मराठा हायस्कूलसह शहर परिसरातील अन्य शाळांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

महापौर रंजना भानसी, कार्यक्रमाचे आयोजक योग समितीचे प्रमुख कृष्णा भांडगे, योगतज्ज्ञ प्रज्ञा पाटील, विभागीय क्रीडा उपसंचालक जयप्रकाश दुबळे यांच्या उपस्थितीत कार्यक्रमास सुरुवात झाली. साडेसहा वाजता सुरू होणारा कार्यक्रम पाऊणतास उशीराने सुरू झाला. यावेळी राष्ट्रगीत, योग गीत, काही श्लोकांचे सामूहिक पठण करण्यात आले. शहर परिसरातील इतर भागातून अजून विद्यार्थी येतील, या अपेक्षेने मंत्रोच्चार, प्रार्थना यातच बहुंताश वेळ घालविण्यात आला. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाढलेली अस्वस्थता पाहत आयोजकांनी योग प्रात्यक्षिक वर्गास सुरुवात केली. विद्यार्थ्यांच्या सहनशक्तीचा अंत पाहणारा हा योग वर्ग संपल्यानंतर विद्यार्थीच अधिक आनंदित झाले.

सर्वकाही नियोजित अभ्यासक्रमानुसार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

योगाच्या अभ्यासक्रमात राष्ट्रगीत, हिंदू धर्म प्रार्थना, महामृत्युंजय मंत्र आदींचा समावेश करण्यात आला आहे. कार्यक्रमाच्या नियोजनात या सर्वाचा समावेश करण्यात आला. उद्घाटनानंतर विद्यार्थ्यांना योग मार्गदर्शक आणि योग गुरूंनी विविध योगा, व्यायाम प्रकाराची माहिती दिली. पावसामुळे कार्यक्रमात अडथळा येण्याची शक्यता लक्षात घेऊन विभागीय क्रीडा संकुलात लॉन असल्याने ते स्थळ कार्यक्रमासाठी निश्चित करण्यात आले. अन्य ठिकाणी कार्यक्रमाचे ठिकाण सांगण्यासाठी मार्गदर्शक नियुक्त करण्यात आले होते.

     – प्रज्ञा पाटील,  योग यज्ञ समन्वय समिती सदस्य