मद्यधुंद अवस्थेतील चालकाने सुसाट मोटार दामटत उपनगर ते वडाळा, पाथर्डी फाटा ते चांडक सर्कल मार्गांवर अक्षरश: धुडगूस घालत रस्त्यावरील अनेक वाहनधारकांना उडविले. या मोटारीचा अन्य वाहनधारकांनी पाठलाग केला. परंतु, त्याने कुणाला न जुमानता समोर येईल त्याला उडविण्याचे सत्र सुरूच ठेवले. अगदी टायर फुटल्यानंतरही तो वाहन थांबविण्यास तयार नव्हता. अखेर चांडक सर्कल चौकात जमावाने त्याला पकडले. या थरारात जखमी झालेल्या दोन जणांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.

हेही वाचा >>>झोपडपट्टीधारकांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक; नाशिक तालुक्यात तीन हजार अतिक्रमणधारकांना नोटीस

साहेबराव निकम असे या संशयित चालकाचे नाव आहे. सायंकाळी पाचच्या सुमारास हे थरार नाट्य घडले. त्याची सुरूवात नाशिकरोडच्या उपनगर भागातून झाली. मद्यपी चालक भरधाव नाशिक-पुणे महामार्गावरून मार्गस्थ झाला. अशोका मार्ग, वडाळा गाव या अतिशय वर्दळीच्या भागात सुसाटपणे त्याने काही वाहनधारक आणि पादचाऱ्यांना उडविले. वाहतूक पोलिसांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने त्यांनाही जुमानले नाही. त्यांनाही उडविल्याचे प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात आले. काही चौकात जमाव जमला. अनेक वाहनधारकांनी सुसाट निघालेल्या मोटारीचा पाठलाग सुरू केला. मद्यपी चालक मुंबई-आग्रा महामार्गाकडे त्याच वेगात पाथर्डी आणि नंतर चांडक सर्कल चौकात गेल्याचे सांगितले जाते. मार्गात अनेक ठिकाणी त्याची मोटार रोखण्याचे प्रयत्न झाले. पण संबंधिताने त्यांनाही उडवून पळ काढला. वेग इतका होता की, त्या मोटारीचे टायर फुटले. पण, संशयिताने वाहन थांबविले नाही. या नाट्याचा शेवट तिडके कॉलनीतील चांडक सर्कल चौकात झाला. जमावाने या ठिकाणी मद्यपी चालकाला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.

हेही वाचा >>>नाशिक: गरम पाणी अंगावर पडल्याने बालिकेचा मृत्यू

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मद्यपी चालकाच्या थरार नाट्यात दोन दुचाकीस्वार जखमी झाले. त्यातील एकाच्या पायावरून मोटार गेली. एक जखमी व्यक्ती सिन्नर येथील शिक्षक असल्याचे कळते. या घटनाक्रमात दोन पोलीसही जखमी झाल्याचे सांगितले जाते. परंतु, त्यास यंत्रणेकडून दुजोरा मिळाला नाही. वर्दळीच्या रस्त्यांवर मद्यपी चालकाने अतिशय निर्दयीपणे मोटार दामटली. अन्य वाहने, पादचारी यांचा विचार केला नाही, अशी प्रतिक्रिया जमावाकडून उमटत होती. यात अनेक जण जखमी झाल्याचा अंदाज आहे. संशयित चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.