राज्यात सध्या ‘नीट’वरून जी गोंधळसदृश स्थिती आहे, त्या पाश्र्वभूमीवर, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या दीक्षान्त सोहळ्यास उपस्थित राहणाऱ्या वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना पालक व विद्यार्थ्यांकडून लक्ष्य केले जाईल, ही शक्यता गृहीत धरून मंगळवारी सकाळपासून विद्यापीठ परिसर व कार्यक्रमस्थळावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. नाशिक शहरात दिवसाढवळ्या गुन्हेगारी घटनांचे सत्र सुरू असताना कधीही दृष्टिपथास न पडणारे पोलीस मंत्रिमहोदयांच्या सुरक्षिततेसाठी चांगलीच धावपळ करताना दिसले. शहर पोलिसांची यंत्रणा सर्वसामान्यांच्या सुरक्षिततेसाठी कधी कार्यप्रवण राहील, असा प्रश्नही उपस्थित स्थानिक नागरिकांना पडला. आरोग्य विद्यापीठानेही कार्यक्रम निर्विघ्न पार पाडण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या पोलीस यंत्रणेची खास बडदास्त ठेवल्याचे पाहावयास मिळाले.
आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कार्यक्रमास केंद्रीय आरोग्यमंत्री जगतप्रकाश नड्डा व वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे उपस्थित राहणार होते. मात्र ऐन वेळी नड्डा कार्यक्रमास आले नाही. ‘नीट’च्या मुद्दय़ावरून राज्यातील वातावरण तापले आहे. त्यामुळे पालक वा विद्यार्थी संघटनांकडून तावडे यांना घेराव घातला जाऊ शकतो, त्यांचा ताफा अडवला जाऊ शकतो किंवा मुख्य कार्यक्रमात गोंधळ घातला जाऊ शकतो या काही शक्यतांचा विचार करीत पोलिसांनी दीक्षान्त सोहळा सुरळीत पार पाडावा, या दृष्टीने काटेकोरपणे नियोजन केले. २०० हून अधिक कर्मचारी, उपायुक्त दर्जाचे अधिकारी असा फौजफाटा विद्यापीठाच्या आवारात सकाळी आठ वाजेपासून तैनात करण्यात आला. यासाठी विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर प्रत्येकाची अडवणूक करीत कोण कुठे जात आहे याची विचारणा करण्यात आली. तसेच मुख्य कार्यक्रमस्थळी पोलीस छावणीचे रूप प्राप्त झाले.
कार्यक्रमस्थळी काही पालकही आले होते. तथापि, प्रचंड पोलीस बंदोबस्त पाहून ते हबकले. त्यात पालकांमध्ये एकी नसल्याने तसेच ‘नीट’च्या प्रश्नावर नेमकी बाजू मांडणारे खंबीर नेतृत्व नसल्याने पालकांनी आंदोलनाचा पर्याय गुंडाळला. शिक्षणमंत्र्यांनी पालकांनी आंदोलन करण्याऐवजी आपण चर्चेस तयार असल्याचे आश्वासन देत निघून जाणे जाणे पसंत केले.
दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून शहरातील कायदा व सुव्यवस्था ढासळली आहे. गेल्याच आठवडय़ात शहरात वाहनांची जाळपोळ, खून आदी अनेक प्रकार घडले. त्या वेळी अशा संख्येने पोलीस रस्त्यावर उतरल्याचे पाहावयास मिळाले नाही. मंत्रिमहोदयांच्या सुरक्षिततेसाठी सुरक्षा कवच पुरविणारी नाशिकची पोलीस यंत्रणा सर्वसामान्यांच्या सुरक्षिततेसाठी कधी असा विचार करणार काय, असा प्रश्न बंदोबस्त पाहणाऱ्या प्रत्येकाला पडला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Education minister vinod tawde get huge police protction
First published on: 18-05-2016 at 01:29 IST