जळगाव – हनी ट्रॅप प्रकरणात अनेक उच्चपदस्थ अधिकारी आणि राजकारण्यांच्या समावेशाचा संशय असल्याने त्यावरून माझे लक्ष विचलित करण्यासाठी भाजप प्रयत्नशील असल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी काही दिवसांपूर्वी जळगावमध्ये केला होता. प्रत्यक्षात, पुणे रेव्ह पार्टी प्रकरणात जावई प्रांजल खेवलकर यांचे नाव आल्यापासून खडसेंनी हनी ट्रॅप प्रकरणावरील लक्ष कमी केल्याचे दिसून येत आहे. हनी ट्रॅपमधील मुख्य संशयित प्रफुल्ल लोढा किंवा मंत्री गिरीश महाजन यांचा उल्लेख करणेही त्यांनी टाळले आहे.

जामनेर तालुक्यातील रहिवाशी असलेल्या प्रफुल्ल लोढावर हनी ट्रॅप प्रकरणी गुन्हे दाखल झाल्यानंतर आमदार एकनाथ खडसे यांनी लोढा आणि मंत्री गिरीश महाजन यांचे अतिशय घनिष्ठ संबंध असल्याचा आरोप केला होता. त्यापुढे जाऊन महाजन हे देखील हनी ट्रॅपमध्ये सहभागी असल्याचे खळबळजनक वक्तव्य खडसे यांनी केले होते.

सत्य मांडणे हे माझे कर्तव्य आहे आणि मी कोणत्याही परिस्थितीत अजिबात मागे हटणार नाही, असा निर्धारही खडसे यांनी व्यक्त केला होता. महायुतीच्या सरकारमध्ये मंत्री असताना जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारावरून आरोप झाल्यानंतर मी नैतिक जबाबदारी स्वीकारून मंत्रिपदाचा तातडीने राजीनामा दिला होता. त्यानुसार, हनी ट्रॅप प्रकरणातील संशयित प्रफुल्ल लोढाशी संबंध असल्याचा आरोप झाल्यानंतर मंत्री महाजन यांनीही नैतिकता दाखवून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी देखील खडसे यांनी केली होती.

विषय भरकटला पाहिजे म्हणून सत्य बोलणाऱ्याला लक्ष्य करणे ही भाजपची सध्याची पद्धत झाली आहे. परंतु, मी कोणताच खोटा आरोप केलेला नाही. पुराव्यांच्या आधारेच प्रश्न उपस्थित केले आहेत. राज्यात सत्ता तुमची आहे. जर कोणाला माझ्या विधानांमध्ये तथ्य वाटत नसेल तर त्यांनी खुल्या चौकशीची मागणी करावी, असेही आवाहन खडसे यांनी दिले होते. दरम्यान, खडसेंना प्रत्युत्तर देताना मंत्री महाजन यांनी थेट मुलाच्या मृत्यु प्रकरणाला हात घालून त्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला.

दुसरीकडे, महाजन यांना लक्ष्य करताना त्यांनी कमावलेल्या संपत्तीवर खडसेंनी बोट ठेवले. महाजन हा एका शाळा मास्तरचा पोरगा असतानाही आज कोट्यवधींचा मालक आहे. एवढा पैसा त्यांच्याकडे आला कुठून?” असा प्रश्न खडसे यांनी उपस्थित केला. अशा या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी पुणे रेव्ह पार्टी प्रकरणात एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर यांचे नाव आल्यापासून पूर्णपणे थांबल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हनी ट्रॅप प्रकरण उघडकीस आल्यापासून एकनाथ खडसे यांनी जळगावात एक दिवसाआड पत्रकारांशी बोलताना मंत्री गिरीश महाजन यांना टिकेचे लक्ष्य करणे सुरूच ठेवले होते. दुसरीकडे, महाजन यांनीही शांत न राहता खडसेंना जोरदार प्रत्युत्तर देण्यावर भर दिला होता. मात्र, पुणे रेव्ह पार्टी प्रकरणानंतर खडसे यांनी जळगावात एकदाही पत्रकार परिषद घेतलेली नाही की हनी ट्रॅप प्रकरणावरून प्रफुल्ल लोढा किंवा मंत्री महाजन यांच्यावर टीका केलेली नाही. हनी ट्रॅपवरून खडसेंचे लक्ष विचलित झाल्यानंतर महाजन यांनीही मौन धारण करणे पसंत केल्याचे दिसत आहे.