मालेगाव : आगामी जिल्हा परिषद,पंचायत समिती व महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना शिंदे गटाचा मालेगाव येथे जंगी मेळावा पार पडला. तालुक्यात आजवर झालेली विविध विकास कामे तसेच सरकारच्या वेगवेगळ्या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी शिवसेना शिंदे गटातर्फे घेतली जाणारे परिश्रम यावर मेळाव्यात जाणीवपूर्वक प्रकाश टाकण्याचा प्रयत्न झाला.
भाजप, शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) या तीन पक्षांची महायुती राज्याच्या सत्तेत आहे. आगामी निवडणुकांमध्ये स्थानिक पातळीवर अशी महायुती होईल का, यासंदर्भात माध्यमांनी संवाद साधल्यावर भुसे यांनी त्याचे स्पष्ट उत्तर देण्याचे टाळले. किंबहुना त्यांनी केलेल्या विधानाने महायुती संदर्भात आणखीनच संभ्रम निर्माण झाल्याचे दिसत आहे.
राज्यात बराच काळ लांबलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका टप्प्याटप्प्याने सुरू झाल्या आहेत. पहिल्या टप्प्यात नगरपंचायत व नगरपरिषदांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. यानंतर लवकरच जिल्हा परिषद, तालुका पंचायत समिती व मालेगाव महापालिकेची निवडणूक जाहीर होणार आहे. या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटातर्फे येथील बाजार समिती आवारात शेतकरी, कामगार व कार्यकर्ता मेळावा पार पडला.
मालेगाव तालुक्यातील ११ गावांच्या गावठाण विस्तारासाठी शेती महामंडळाची जमीन देण्यात आली आहे. या जमिनींचे हस्तांतरण आदेश वितरण तसेच कृषि सहाय्य योजनेतंर्गत ट्रॅक्टर,शेती अवजारे व इतर साहित्यांचे वाटप, अतिवृष्टी व कांदा अनुदान आणि बांधकाम कामगार साहित्याचे वाटप मेळाव्यात करण्यात आले. नानाजी देशमुख कृषि संजीवनी योजना (पोकरा) टप्पा-२ कार्यान्वित करणे तसेच धर्मवीर आनंदजी दिघे सहायता कक्ष कार्यपूर्ती या विषयावर मेळाव्यात मार्गदर्शन करण्यात आले. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे माजी महानगरप्रमुख राजाराम जाधव यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या मेळाव्याप्रसंगी शिंदे गटात प्रवेश केला.
गेल्या वेळी झालेल्या महापालिका व जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणुकीत मालेगाव तालुक्यात भाजप व अखंडित शिवसेना या पक्षांची युती होऊ शकली नव्हती. विशेष म्हणजे त्यावेळेस राज्यात या दोन्ही पक्षांच्या युतीचे सरकार अस्तित्वात होते. दादा भुसे या सरकारमध्ये राज्यमंत्री होते.
दरम्यानच्या काळात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. भुसे हे गेली सहा वर्षे कॅबिनेट मंत्री म्हणून कार्यरत आहेत. राज्य मंत्रिमंडळात एक वजनदार मंत्री म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे. मतदार संघावरील त्यांची पकड देखील उत्तरोत्तर घट्ट बनली असल्याचे दिसत आहे. राज्याच्या राजकारणात आता भाजप, शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) या तीन पक्षांची महायुती आकाराला आली आहे. अशा स्थितीत जिल्हा परिषद, पंचायत समिती व मालेगाव महापालिकेच्या निवडणुकीत भुसे हे मित्र पक्षांशी युती करतील का, याबद्दल उलटसुलट मतप्रवाह दिसून येत आहेत. माध्यमांनी याच प्रश्नावर बोट ठेवल्यावर भुसे यांनी संदिग्ध उत्तर दिल्याने याबद्दलचा संभ्रम आणखीनच वाढला आहे.
आमचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आगामी निवडणुकांसाठी महायुती करण्याचे आदेश दिले आहेत, असे भुसे यांनी ठासून सांगितले. परंतु,त्याचवेळी महायुती करतानाची परिस्थिती कशी समोर येईल, त्यानुसार मार्गक्रमण करावे लागेल आणि पुढे जावे लागेल, असे सांगण्यास देखील ते विसरले नाहीत.
महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकीच्या उमेदवारीसाठी शिंदे गटात इच्छुकांची संख्या तुलनेने अधिक आहे. त्यामुळे उमेदवार निश्चित करणे भुसे यांच्यासाठी मोठी डोकेदुखी होणार असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. तीन पक्षांची महायुती झाली तर शिंदे गटाच्या वाटेला येणाऱ्या जागा कमी होतील. परिणामी इच्छुकांची नाराजी वाढेल. ही नाराजी भुसे यांच्यासाठी अडचणीची ठरण्याची शक्यता आहे. म्हणूनच पुढील काळात समोर येणाऱ्या परिस्थितीनुसार युतीबद्दल मार्गक्रमण करण्याचे संकेत त्यांनी दिले असावेत, असा अर्थ त्यांच्या विधानाचा काढण्यात येत आहे.
