नाशिक: गई बोला रे धिना.. काट्टा दे ढिल.. अशा आरोळय़ांना संगीत अन् ढोल, थाळीनादाच्या साथीने दणाणून गेलेल्या वातावरणात पतंगप्रेमींनी संक्रात हा नववर्षांतील पहिला सण उत्साहात साजरा केला. पतंगीच्या काटाकाटीद्वारे एकमेकांना शह देण्याचे प्रयत्न झाले. मांजाच्या धास्तीने वाहनधारकांना जीव मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागले. प्रतिबंधित नायलॉन मांजाची विक्री आणि वापर तसेच डिजे यंत्रणा लावून गोंधळ घालणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात संक्रांतीला पतंगोत्सवाचे मोठे महत्व आहे. करोना काळातील निर्बंधामुळे बाहेर फिरणे टाळावे लागल्याने त्याची भरपाई पतंगोत्सवातून करण्यात आली.

सकाळपासून ठिकठिकाणी गच्चीवर, मैदानांमध्ये गटागटाने जमलेल्या मंडळींनी पतंगोत्सवाचा आनंद लुटला.  यानिमित्ताने संपूर्ण वातावरण पतंगमय झाले होते. सर्वाच्याच नजरा आकाशाकडे खिळलेल्या होत्या. बालगोपाळच नव्हे तर, ज्येष्ठांसह महिलांनीही पतंगोत्सवाचा आनंद लुटला. कॉलन्यांमध्ये इमारतीच्या गच्चीवर गटागटाने जमून संगीताच्या तालावर पतंग उडविले जात होते. दुपारनंतर वारा गायब झाला. त्यामुळे काही काळ सक्तीची विश्रांती घ्यावी लागली. सायंकाळी वाऱ्याचा वेग वाढल्यानंतर पुन्हा उत्साहाला उधाण आले. पतंग कापल्यानंतर थाळीनाद आणि घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. काही ठिकाणी डिजेचाही वापर झाला. ध्वनिप्रदूषण नियमांचे उल्लंघन होत असल्याने पोलिसांनी ही यंत्रणाही जप्त केली. पर्यावरणास हानीकारक ठरणाऱ्या नायलॉन मांजावर बंदी आहे. या मांजाची विक्री करणाऱ्यांविरोधात कारवाईचे सत्र राबविले गेले. काटलेले पतंग जमा करण्यासाठी जिवाची पर्वा न करता अनेक तरूण रस्त्यावरील वाहनांची पर्वा न करता धावताना दृष्टीस पडत होते. मागील काही वर्षांत रस्त्यावर येणाऱ्या नायलॉन मांज्याने वाहनधारक जखमी झाल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे या दिवशी वाहनधारकांना सावधपणे मार्गक्रमण करावे लागले. येवल्यातही पतंगोत्सव उत्साहात साजरा झाला.

वीज पुरवठय़ास फटका ?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

 पतंगोत्सवाच्या दिवशी शहरातील अनेक भागात विजेचा लपंडाव सुरू होता. गंगापूर रोडचा काही भाग सायंकाळी सात वाजेपर्यंत अंधारात होता. पतंगोत्सव साजरा करताना उच्च व लघु दाबाच्या वीजवाहिन्या, रोहित्र आणि वीज यंत्रणापासून सुरक्षित अंतर आणि सावधगिरी बाळगावी, असे आवाहन महावितरणने आधीच केले होते. वीजतारा तसेच वाहिन्यांमध्ये अडकलेले पतंग आणि धागे वीज पुरवठा खंडित होण्यास कारणीभूत ठरत असतात. त्यामुळे ग्राहकांना विजेपासून वंचित राहावे लागते याकडे लक्ष वेधले गेले. संक्रातीच्या दिवशी वीज पुरवठा वारंवार विस्कळीत होण्यामागे पतंगोत्सव कारक ठरल्याची साशंकता व्यक्त करण्यात आली