शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातील अल्प साठय़ामुळे पंधरवडय़ापूर्वी शहराच्या विविध भागात आवर्तनानुसार आठवडय़ातून एक दिवस पाणी पुरवठा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु, या निर्णयामुळे काही भागात कमी दाबाने पाणी पुरवठा होणे, तर कुठे पाणीच न येण्यासारखे प्रकार घडू लागले. या प्रकारांचा फायदा उठविण्यास राजकीय मंडळींकडून सुरूवात होताच अखेर संपूर्ण शहरात यापुढे दर गुरूवारी पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला आहे.
टंचाईला तोंड देण्यासाठी महापालिका प्रशासनाने आठवडय़ातून एक दिवस विभागवार पाणी बंद करण्याचा निर्णय घेतल्यावर त्यातील काही त्रुटी पुढे आल्या. बंद नसलेल्या काही भागांनाही पाणी पुरवठा बंद होण्याच्या समस्येला सामोरे जावे लागले. काही ठिकाणी अत्यंत कमी दाबाने पाणी पुरवठा होऊ लागला. त्यामुळे नागरिकांकडून तक्रारी येऊ लागल्या. या संधीचा आपल्या राजकीय फायद्यासाठी वापर करण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये चढाओढ सुरू झाली. सत्ताधारी मनसे आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोपाचा खेळ रंगू लागला असताना शनिवारी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम आणि महापौर अशोक मुर्तडक यांनी विभागीय पाणी पुरवठा अधिकाऱ्यांची बैठक घेत फेरनियोजनावर चर्चा केली. परंतु, कोणताही निर्णय झाला नाही. त्यातच मनसेने शनिवारीच शहरात टँकरव्दारे मागेल त्याला मोफत पाणी देण्याची योजना सुरू केली. त्यासाठी मनसेचे चिन्ह असलेले सात टँकरही सज्ज करण्यात आले. पाण्यावरून राजकारण तापू लागले असताना रविवारी आयुक्तांनी संपूर्ण शहरात यापुढे दर गुरूवारी पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
फेरनियोजनाप्रमाणे पाणी पुरवठा सुरू झाल्यावर पुन्हा काही तांत्रिक अडचणी उद्भवल्यास फेरआढावा घेऊन निर्णय घेण्यात येणार आहे. एप्रिलमध्ये एकलहरे औष्णिक विद्युत केंद्राचा पाणी वापर, दारणा धरणातील आवर्तन, धरणातील शिल्लक पाणीसाठा हे सर्व ध्यानात घेऊन पाणी पुरवटय़ासंदर्भात फेरविचार करण्यात येणार आहे. त्यापुढील काळातही हवामानाचा अंदाज घेऊन योग्य ते निर्णय वेळोवेळी घेण्यात येतील, असे आयुक्तांनी नमूद केले आहे. पाणी बचतीसाठी जनजागृती मोहीम सुरू करणाऱ्या पालिकेने नाशिककरांना अत्यंत काटकसरीने पाणी वापरण्याची सूचना केली आहे. पाण्याचा कमी वापर, पुनर्वापर, पुनप्र्रक्रिया यांचा अवलंब करण्यास सुचविले आहे. पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी पालिकेने त्या त्या विभागीय अधिकाऱ्यांमार्फत स्वतंत्र पथक नेमून दंडात्मक कारवाईही सुरू केली आहे. नागरिकांना आपल्या भागात कुठे पाणी गळती, पाण्याचा गैरवापर होत असल्याचे निदर्शनास आल्यावर त्यासंदर्भात संबंधित विभागीय अधिकारी, उप अभियंत्यांना कळविण्याचेही आवाहन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी केले आहे.