‘मृत्युकडे पाठ करुन आणि जीवनाकडे चेहरा ठेवून जगायला शिका. वेळ येईल तेव्हा मृत्यू अटळ आहे. पण तोपर्यंत चांगले जगणे तुमच्या हातात आहे. तुम्ही किती दिवस जगता यापेक्षा निरोगी किती राहता हे महत्त्वाचे आहे. निरोगी राहण्यासाठी कायम शरीर जे सांगेल ते ऐका. आपले शरीर वेळोवेळी आपल्याला अनेक सूचना करत असते. त्या सूचना बारकाईने पाळल्यास तुम्हाला कधीही डॉक्टरकडे जाण्याची किंवा औषधोपचाराची गरज भासणार नाही.’ असे प्रतिपादन प्रसिद्ध सर्जन डॉ.राजीव शारंगपाणी यांनी केले.

एचपीटी आर्टस अॅण्ड आरवायके सायन्स कॉलेजच्या विदयार्थी सभा व कलामंडळातर्फे ‘स्मार्ट कट्टा-एक मुक्त संवाद’ ही संकल्पना गेल्या दोन वर्षांपासून राबविण्यात येत आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षात दुसरा ‘स्मार्ट कट्टा-एक मुक्त संवाद’ सोमवारी पार पडला. यावेळी ‘आपली बदलती लाइफस्टाइल’ या विषयावर  प्रसिद्ध सर्जन डॉ.राजीव शारंगपाणी यांनी प्राध्यापक व विद्यार्थ्यांशी मुक्तसंवाद साधला.

डॉ.राजीव शारंगपाणी पुढे म्हणाले, ‘आजची तरुणाई आउट ऑफ द बॉक्स विचार करणारी आहे. ही खूपच चांगली गोष्ट आहे. आपल्या बदलत्या जीवनशैलीत दुःखी राहणे टाळा. तुम्हाला दुःख होत असेल तर ते कसे घालवावे, हे तुम्हाला माहित असते. त्यामुळे ज्या गोष्टीतून आनंदी राहता येईल तेच करा. कोणतीही गोष्ट करताना समोरच्या व्यक्तीचे सल्ले घेण्याची आपल्याला सवय असते. पण ज्या सल्ल्यांमधून तुम्हाला त्रास होत आहे ते सल्ले पाळू नका. आपले शरीर हे पुस्तक आहे. ते वाचायला शिका. शरीराला त्रास करुन घेण्यापेक्षा शरीर आणि मन आनंदी ठेवल्यास निरोगी राहता येते’, असे ते म्हणाले.

व्यायामावर बोलताना ते म्हणाले की, ‘कोणताही व्यायाम प्रकार परिपूर्ण नसून लवचिकतेसाठी जॉगिंग, सायकलींग अशा सर्व प्रकारातील व्यायाम स्त्री आणि पुरुष दोघांनीही करायलाच हवा. व्यायामाची सवय लावल्यास आयुष्य आनंदी ठेवता येते.’ कार्यक्रमाचे संयोजन प्राचार्य व्ही.एन.सुर्यवंशी, पत्रकारिता व कलामंडळ विभागप्रमुख डॉ. वृंदा भार्गवे, विदयार्थी विकास अधिकारी डॉ.विजयकुमार वावळे, विद्यार्थी प्रतिनिधी सौरभ बेंडाळे यांनी केले.