मालेगाव : राज्य उत्पादन शुल्क विभागाने तालुक्यातील लखाणे येथे जंगल परिसरात सुरू असलेल्या बनावट देशी-विदेशी मद्य निर्मिती कारखान्यावर छापा टाकून १४ लाख ५१ हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार संशयितांचा शोध घेण्यात येत आहे.
लखाणे शिवारातील जंगल क्षेत्रालगत असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये बनावट मद्य निर्मितीचा कारखाना सुरू असल्याची खबर उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. त्याआधारे विभागाच्या पथकाने रात्री छापा टाकून कारवाई केली. या ठिकाणी मद्य बनविण्यासाठी लागणारे साहित्य, विविध कंपन्यांच्या नावाने देशी, विदेशी बनावट मद्य भरलेल्या आणि रिकाम्या बाटल्या, मद्यसाठा वाहतुकीसाठी वापरण्यात येणारे मालवाहू वाहन आणि दुचाकी असा मुद्देमाल आढळून आला. हा सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. राजेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली विभागाचे मालेगाव येथील निरीक्षक वसंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली. पथकात निरीक्षक सी.एच.पाटील, आर.जे.पाटील, दुय्यम निरीक्षक सागर नलवडे, रियाज शेख, मनीष पाटील आदींचा समावेश होता.
दरम्यान, अवैध मद्य निर्मिती,विक्री व वाहतूक होत असल्याबद्दल नागरिकांना माहिती असेल तर १८००२३३९९९९ या टोल फ्री क्रमांक किंवा ८४२२००११३३ या व्हॉट्सॲप क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन उत्पादन शुल्क विभागातर्फे करण्यात आले आहे. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल, असेही या विभागाने नमूद केले आहे.