शहरातील सिडको, पाथर्डी आणि नाशिकरोडच्या काही भागांस रविवारी सायंकाळी जोरदार पावसाने झोडपून काढले. तासभर झालेल्या या पावसामुळे ऐन काढणीस आलेल्या द्राक्ष पिकांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाल्याने द्राक्ष बागायतदार हादरले आहेत. शहर व परिसरात दुपापर्यंत कडक ऊन होते. दुपारी तीननंतर अचानक बदल होऊन वातावरण ढगाळ झाले. सायंकाळी पाचच्या सुमारास सिडकोतील पवननगर, त्रिमूर्ती चौक तसेच इंदिरानगर, पाथर्डी आणि नाशिकरोडच्या काही भागांत रिमझिम सुरू झाली. अध्र्या तासानंतर पावसाने चांगलाच वेग घेत परिसरास झोडपून काढले. या पावसाचा सर्वाधिक फटका द्राक्षबागांना बसला. सध्या द्राक्ष काढणी सुरू असून बहुसंख्य बागायतदारांना द्राक्ष काढणीसाठी मजुरांची प्रतीक्षा असताना अचानक आलेल्या पावसाने त्यांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले. पावसामुळे मणी गळून पडण्याचे प्रकार घडले. घडावर शिल्लक राहिलेल्या मण्यांच्या दर्जेदारपणावर पावसाचा परिणाम होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. आंब्याचा मोहोरही पावसाने झटकला गेला. मागील वर्षीही द्राक्ष काढण्यास आले असतानाच अवकाळी पाऊस आणि गारपिटीने धिंगाणा घातला होता. जिल्ह्य़ात शेतकऱ्यांचे कोटय़वधी रुपयांचे नुकसान झाले होते.