जिल्हाधिकाऱ्यांना गुलाबपुष्प देऊन पॉलीहाऊस, शेडनेटधारकांना कर्जमुक्तीचा लाभ देण्याची मागणी
पॉलीहाऊस व शेडनेटधारकांना कर्जमुक्तीचा लाभ मिळावा, या मागणीसाठी शुक्रवारी किसान सभेच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी गुलाबपुष्प घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. जिल्हाधिकारी व निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना गुलाबपुष्प देऊन गांधीगिरी पध्दतीने आंदोलन करण्यात आले.
शेतकरी संपानंतर राज्य शासनाने दीड लाखपर्यंतची थकीत कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला. त्यात शेडनेट व पॉलीहाऊसधारक शेतकऱ्यांना वगळण्यात आले. या पाश्र्वभूमीवर, संबंधित मोर्चासाठी पॉलीहाऊसमध्ये उत्पादित केलेली गुलाबपुष्प घेऊन शेतकरी सहभागी झाले.
पॉलीहाऊसमध्ये गुलाब व तत्सम फुलांचे उत्पादन घेऊन ते निर्यात केली जातात. या माध्यमातून देशाला परकीय चलन मिळवून देणारा शेतकरी अडचणीत सापडला आहे. कमी क्षेत्रात आधुनिक शेतीची कास धरत शेकडो शेतकऱ्यांनी पॉलीहाऊस व शेडनेटचा मार्ग स्वीकारला. या शेतीला पॉलीहाऊस उभारण्यासाठी प्रतिगुंठय़ास ९० हजार तर शेडनेटसाठी प्रतिगुंठय़ास ४० हजार इतका खर्च येतो. त्याकरिता आम्ही राष्ट्रीयकृत बँका, सहकारी सोसायटी व पतसंस्था यांच्याकडून कर्ज घेतले आहे. अस्मानी संकटामुळे पॉलीहाऊस व शेडनेटचे अच्छादन फाटणे, दुष्काळामुळे पिके उद्ध्वस्त होऊन पुनर्लागवडीचा खर्च वाढत आहे. त्यातून ज्यांनी कसेबसे उत्पादन घेतले, त्यांच्या मालास भाव नाही. आमच्या कर्जाची आकडेवारी शेतजमिनीच्या किमतीपेक्षा अधिक असल्याने जमीन विकूनही कर्जाची परतफेड करता येत नाही. यामुळे शासनाने सर्व पॉलीहाऊस व शेडनेटधारकांना कर्जमुक्ती द्यावी, स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करावी, अशी मागणी किसान सभेचे जिल्हाध्यक्ष राजू देसले यांनी दिली.
नागरिकांना कुतूहल
शेडनेट व पॉलीहाऊसधारक शेतकरी बी. डी. भालेकर मैदानावरून मोर्चेकरी निघाल्यानंतर प्रत्येकाच्या हाती गुलाबपुष्प होते. एखाद्या मोर्चात सर्व मोर्चेकरी कधी अशी फुले घेऊन सहभागी झाली नसल्याने नागरिकांना मोर्चाबद्दल कुतूहल वाटले. जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकल्यानंतर मोर्चेकऱ्यांचे शिष्टमंडळ जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी गेले. जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन व निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना शिष्टमंडळाने गुलाबपुष्प देत आपले गाऱ्हाणे मांडले.