वीज पडल्याने गायी दगावलेल्या तालुक्यातील दोघा शेतकऱ्यांच्या पदरात तब्बल नऊ महिन्यानंतर नुकसान भरपाईचा धनादेश पडला आहे. भरपाई देण्यात होणाऱ्या विलंबाची नवनियुक्त तहसिलदार नितीनकुमार देवरे यांनी तात्काळ दखल घेतल्याने ही भरपाई मिळू शकली आहे.

गेल्या जून महिन्यात वीज पडल्याने कुकाणे येथील शेतकरी अशोक दासनुर व कंक्राळे येथील रतन कन्नोर यांची प्रत्येकी एक गाय मृत्यूमुखी पडली होती. या संदर्भात महसूल प्रशासनातर्फे रितसर पंचनामा करुन नुकसान भरपाईसाठी प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यानंतर भरपाईसाठी निधी मंजूरही झाला. परंतु प्रत्यक्षात तो वितरित करण्याची कार्यवाही होऊ शकली नव्हती. याबाबत अनेकदा पाठपुरावा करूनही तांत्रिक अडचण पुढे करत वाटाण्याच्या अक्षता लावल्या जात असल्याची या शेतकऱ्यांची तक्रार होती.

हेही वाचा >>> नाशिक: प्रलंबित देयकांसाठी शिक्षक संघ आक्रमक; उपसंचालक कार्यालयास कुलूप लावण्याचा इशारा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या दोघा शेतकऱ्यांनी मंगळवारी मालेगाव तहसीलदार पदाचा नुकताच कार्यभार स्वीकारलेले नितीनकुमार देवरे यांची भेट घेऊन ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली. देवरे यांनी याची गंभीर दखल घेत संबंधित कारकुनास पाचारण करुन वस्तुस्थिती जाणून घेतली. त्यावेळी अनुदान मंजूर असताना शेतकऱ्यांना धनादेश दिला गेला नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तेव्हा देवरे यांनी तात्काळ नुकसान भरपाईचे धनादेश बनविण्याचे आदेश दिले व त्यानुसार दोघा शेतकऱ्यांकडे लगेचच हे धनादेश सुपूर्द केले. भरपाईसाठी इतके दिवस तहसील कार्यालयाचे उंबरठे झिझविणे व्यर्थ ठरत गेल्याने दोघेही शेतकरी त्रस्त झाले होते. परंतु आता काही मिनिटात हाती धनादेश पडण्याच्या प्रशासकीय अनुभवामुळे दोघाही शेतकऱ्यांना सुखद् धक्का बसला.