कर्जमाफी, कृषिमालास हमीभाव यासह विविध प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी १ जूनपासून संपावर निघालेल्या शेतकरी आंदोलनाची गावोगावी जनजागृती करण्याकरीता मराठा क्रांती मोर्चाने आर्थिक रसद पुरविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या संपाबाबत माहिती देण्याकरीता शेकडो फलक, हजारो स्टिकर व पत्रकांची छपाई प्रगतीपथावर आहे. मराठा क्रांती मोर्चा आणि शेतकरी संप यामध्ये सहभागी झालेले अनेक पदाधिकारी एकच आहे. मराठा क्रांती मोर्चासाठी संकलित झालेला निधी सामाजिक कार्यासाठी वापरण्याचे प्रयोजन आहे. त्या अंतर्गत काही निधी संपाच्या तयारीसाठी देण्यात येणार आहे.

राज्यातील शहरांचा भाजीपाला व दूध पुरवठा खंडित करण्यासाठी किसान क्रांतीचे पदाधिकारी सध्या शेतकऱ्यांच्या बैठका घेऊन संपाबाबत जनजागृती करीत आहेत. आपल्या गावातील दूध, भाजीपाला, फळे, फुले शहरांमध्ये विक्रीस न्यायचा नाही तसेच शेती संलग्न व्यवसाय बंद ठेवून संप यशस्वी करण्याचे  नियोजन प्रगतीपथावर आहे. त्या अंतर्गत दुचाकी फेरी, पत्रकांचे वितरण, बाल शाहिरांकडून प्रबोधन, ग्रामसभेत संपाबाबत सामूहिक शपथ, गावोगावी व बाजार समित्यांमध्ये बैठकांचे सत्र सुरू आहे. तालुक्याचे ठिकाण, बाजार समितीचे प्रवेशद्वार आदी ठिकाणी शेतकरी संपाचे फलक झळकत आहेत. हजारो टेम्पो व जीप दररोज कृषिमालाची बाजार समित्यांमध्ये वाहतूक करतात. या वाहनधारकांना संपाबाबतची भूमिका समजावत त्या वाहनांसह शेतकऱ्यांच्या वाहनांवर संपाचे हजारो ‘स्टिकर’ लावण्यात आले आहे. या प्रयत्नांना मराठा क्रांती मोर्चाचे पाठबळ मिळाले.

नियोजनात प्रत्येक तालुक्यातील मंडळींनी स्वत:हून सहभाग घेतला. संपाच्या प्रचार व प्रचारार्थ जी सामग्री लागते, तिचा खर्च तालुका पातळीवर सधन शेतकरी करतात. काही गावांमध्ये तर शेतकऱ्यांनी स्वत:च पैसे काढून फलक उभारले. जनजागृतीसाठी उभारण्यात येणाऱ्या फलकांसाठी मराठा क्रांती मोर्चा निधी देणार असल्याचे अ‍ॅड. कैलास खांडबहाले यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गतवर्षी नाशिकमध्ये मराठा क्रांती मोर्चा काढण्यात आला होता. तेव्हा समाजातील मंडळींनी मोर्चाच्या तयारीसाठी मोठी रक्कम स्वत:हून दिली होती. तो मोर्चा झाल्यानंतर शिल्लक राहिलेला निधी संयोजकांनी नाशिक जिल्हा बँकेत ठेवला. त्यातील काही निधी मुंबईत होणाऱ्या मराठा क्रांती मोर्चासह विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, मंगल कार्यालय उभारणी व तत्सम सामाजिक उपक्रमांसाठी वापरण्याचे नियोजन असल्याचे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक शैलेश कुटे यांनी सांगितले  मुंबईतील मोर्चा लांबल्याने तो निधी तसाच असून सध्या जिल्हा बँक अडचणीत आल्याने ही रक्कमही काढता येत नाही. मराठा क्रांती मोर्चाचे किसान क्रांती मोर्चाचे अनेक पदाधिकारी सारखेच आहेत. संपाच्या तयारीचा खर्च सध्या पदाधिकारी करीत असून पुढील काळात त्यातील काही भाग क्रांती मोर्चाकडून देण्यात येणार असल्याचे पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.