धुळे – तालुक्यातील लळिंग गावाजवळ मुंबई-आग्रा महामार्गावर एका वित्तीय कंपनीच्या वसुली व्यवस्थापकावर प्राणघातक हल्ला करून पावणेदोन लाख रुपये हिसकावून नेल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी अखेर सव्वादोन महिन्यानंतर पाच संशयितांना अटक केली. त्यांच्याकडून २५ हजार रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली.
आप्पासाहेब ठोंबरे (रा. वाखारकरनगर, धुळे) हे सरस्वती फायनान्स प्रायव्हेट लिमिटेडमध्ये वसुली व्यवस्थापक म्हणून नोकरी करतात. नऊ एप्रिल रोजी विविध बचत गटांकडून जमा केलेले पावणेदोन लाख रुपये घेऊन दुचाकीने धुळ्याकडे येत असतांना मुंबई-आग्रा महामार्गावरील लळिंग गावाजवळ काही संशयितांनी त्यांना अडविले. त्यांच्या डोक्यावर काठीने प्रहार केले. त्यांच्याकडील रोकड हिसकावून संशयित पळून गेले. याप्रकरणी आप्पासाहेब ठोंबरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन १० एप्रिल रोजी मोहाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या घटनेच्या तपासासाठी पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांनी नेमलेल्या विशेष पथकाने गोपनीय माहिती आणि तांत्रिक कौशल्याचा वापर करून संशयितांचा माग काढला. नऊपैकी पाच जणांना ताब्यात घेतले. रोहित उर्फ बारकू पवार (२१), दिनेश माळी (२०), भिमा गवळी (२०), लंकेश बोरसे (२२ ) आणि गणेश सोनवणे (२०) सर्व रा. लळिंग, ता.धुळे अशी संशयितांची नावे आहेत.
अटक केल्यानंतर पाचही संशयितांनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर त्यांच्याविरोधात दाखल गुन्ह्यात वाढीव कलम लावण्यात आली. या गुन्ह्यात सहभागी असलेल्या युवराज दावलसे, चंद्रकांत मोरे, शरद आणि समाधान उर्फ सोमा हे चार संशयित अद्याप पोलिसांच्या हाती लागले नसून तेही आता लवकरच सापडतील, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, शहर उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील, उपनिरीक्षक घेतन मुंढे यांच्यासह इतर पोलीस कर्मचाऱ्याऱ्यांनी ही कारवाई केली. पोलीस उपनिरीक्षक चेतन मुंडे हे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.