नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भागासाठी सरदार सरोवरात तैनात असलेल्या तरंगत्या दवाखान्याविषयी लोकसत्ताने वर्तविलेले भाकीत अखेर खरे ठरले. २० जानेवारीला गळती सुरु झाल्याने गुडघाभर पाणी दवाखान्यात शिरले. त्यामुळे धोकादायक प्रवास करुन तरंगत्या दवाखान्याने धरणाचा काठ गाठला. कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानतेमुळे मोठा अनर्थ टळला असला तरी या दुसऱ्या तरंगत्या दवाखान्याचा हा अंतिम प्रवास ठरला आहे.

हेही वाचा- नाशिकमध्ये मानसिक आरोग्यविषयक मानसरंग नाट्य महोत्सव; डॉ. मोहन आगाशे, रंगनाथ पठारेसह अनेकांची उपस्थिती

१७ वर्ष नर्मदा काठावरील आदिवासी बांधवांसाठी जीवरक्षक ठरलेले नंदुरबार जिल्ह्यातील तरंगते दवाखाने अंतिम घटका मोजत असल्याचे वास्तव लोकसत्ताने मांडले होते. दुरुस्ती न झाल्याने धोकादायक झालेल्या या तरंगत्या दवाखान्यातून जीवघेणा प्रवास करुन आरोग्य यंत्रणा आजही दऱ्याखोऱ्यातील आदिवासींना सुविधा देण्याचे काम करीत होती. सरदार सरोवरामुळे विस्थापित झालेल्या नर्मदा काठावरील अनेक गावांना रस्तेच नसल्याने २००५ मध्ये युरोपियन आयोगाने दोन तरंगते दवाखाने जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेला भेट दिले होते. या भागातील सरदार सरोवरापासून ते थेट भुशापर्यत नर्मदा काठावर विखुरलेल्या अनेक गावांना आरोग्य सेवा देण्याचे काम या दोन तरंगत्या दवाखान्याच्या माध्यमातुन सुरु होते. २०१५ साली यातील एक तरंगता दवाखाना मणिबेलीच्या पाडवी पाड्यावर सरदार सरोवरात बुडाला. दुसरीकडे चिमलखेडी येथे असलेल्या दुसऱ्या तरंगता दवाखान्याची अवस्थाही १७ वर्षात दुरुस्तीच न झाल्याने अतिशय बिकट झाली होती. आरोग्य प्रशासनासह राज्य शासनाने दुर्लक्ष केल्याने २० जानेवारी रोजी हा तरंगता दवाखाना बुडता बुडता राहिला.

हेही वाचा- नाशिकमध्ये मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाची जय्यत तयारी – अब्दुल कादर मुकादम अध्यक्षपदी

आंबाईपाडा येथे चार जणांच्या पथकासह हा तरंगता दवाखाना रुग्णांच्या तपासणीसाठी गेला होता. त्याचवेळी दवाखान्यात खालून पाणी शिरत असल्याचे कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. त्यांनी तळाच्या पाट्या काढून पाहणी केली असता तळाला मोठे छिद्र पडल्याने नर्मदेचे पाणी दवाखान्यात शिरत असल्याचे दिसून आले. धोका ओळखून कर्मचाऱ्यांनी दवाखाना सरदार सरोवर धरणकाठावर आणला. काठाकडे दवाखाना नेत असतांना गुडघाभर पाणी साचले होते. त्यामुळे दवाखान्यातील अनेक वस्तु भिजल्या. गळती लक्षात न येता दवाखान्याने तसाच प्रवास केला असता तर मोठी दुर्घटना घडली असती. आता हा दवाखाना पुन्हा वापरात येण्याची शक्यता कमी आहे. या घटनेबाबत आरोग्य प्रशासनाने प्रचंड गोपनीयता बाळगली. मात्र स्थानिक कार्यकर्त्यांनी सदर घटना उघड केली.

हेही वाचा- नाना पटोलेंची काँग्रेसला सावरण्यासाठी तर सत्यजीत तांबेंची सहानुभूतीसाठी धडपड; नाशिक पदवीधर मतदारसंघात चुरस

तरंगत्या दवाखान्याची दिड वर्षांपासून दयनीय अवस्था झाली होती. दुरुस्तीसाठी पाठपुरावा सुरु होता. दुरुस्तीसाठी लागणाऱ्या रकमेत नविन बोट रुग्णवाहिका येईल, असा दावा आरोग्य प्रशासनाकडून करण्यात येत होता. मात्र राज्य स्तरावर स्थानिक प्रशासनाने नव्या बोट रुग्णवाहिकेविषयी कुठलीही वास्तवता मांडली नाही. नव्या बोट खरेदीचा प्रस्ताव जर झाला असता तर गाभा समितीत निर्णय झाला असता. आता अतिदुर्गम भागातील आरोग्य सेवा प्रभावित होणार असून याला जबाबदार कोण ? त्यांच्यावर काही कारवाई होणार का? असा सवाल नर्मदा बचाव आंदोलनाच्या सामाजिक कार्यकर्त्या लतिका राजपूत यांनी विचारला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सदरची बोट २० तारखेला दुर्घटनाग्रस्त झाली आहे. तिला धरणकाठी हलविण्यात आले आहे. सर्व कर्मचारी, अधिकारी सुखरुप आहेत, अशी माहिती नंदुरबार जिल्हा आरोग्य अधिकारी गोविंद चौधरी यांनी दिली