scorecardresearch

नाना पटोलेंची काँग्रेसला सावरण्यासाठी तर सत्यजीत तांबेंची सहानुभूतीसाठी धडपड; नाशिक पदवीधर मतदारसंघात चुरस

काँग्रेसमधील या संपूर्ण नाट्यामागील सूत्रधार भाजप असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असला तरी अद्याप भाजपने उघडपणे तांबे यांना पाठिंबा जाहीर केलेला नाही.

नाना पटोलेंची काँग्रेसला सावरण्यासाठी तर सत्यजीत तांबेंची सहानुभूतीसाठी धडपड; नाशिक पदवीधर मतदारसंघात चुरस
नाना पटोलेंची काँग्रेसला सावरण्यासाठी तर सत्यजीत तांबेंची सहानुभूतीसाठी धडपड; नाशिक पदवीधर मतदारसंघात चुरस ( Image – लोकसत्ता ग्राफिक्स टीम )

अनिकेत साठे

नाशिक : उमेदवारी अर्ज भरण्यातील नाट्यामुळे रंगतदार ठरलेल्या नाशिक विभागीय पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत काँग्रेसकडून शिवसेना, राष्ट्रवादीसह स्वपक्षातील गैरसमज दूर करण्यासाठी धडपड सुरू असताना दुसरीकडे अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांच्याकडून उमेदवारीतील राजकारण परिवाराला अडचणीत आणण्यासाठी असल्याचा दावा करुन सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न केला जात आहे. आ. सुधीर तांबे यांनी अर्ज न भरण्यामागे भाजपचे कटकारस्थान असल्याचा आरोप करीत काँग्रेसने तांबे पिता-पुत्रांमध्ये उमेदवारीवरून कौटुंबिक संघर्ष निर्माण झाला असल्याकडे बोट ठेवले. प्रचारात उभयतांकडून दावे-प्रतिदावे सुरू असल्याने संभ्रम कमी होण्याऐवजी वाढतच आहे.

हेही वाचा… राज्य काँग्रेसला अध्यक्षबाधा?

डॉ. सुधीर तांबे यांनी ऐनवेळी अर्ज न भरता काँग्रेसची पुरती कोंडी केली होती. त्यांचे पुत्र सत्यजित तांबे हे अपक्ष रिंगणात आहेत. अनपेक्षित नाट्यामुळे काँग्रेसला ही जागा शिवसेनेसाठी सोडावी लागली. काँग्रेसचे काही पदाधिकारी तांबे यांच्या प्रचारार्थ काम करीत आहेत. या घटनाक्रमाने निर्माण झालेले समज-गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नाशिक दौऱ्यात केला. त्यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार शुभांगी पाटील यांच्या प्रचारार्थ बैठक पार पडली. तिकीट वाटपातील समज-गैरसमजाचा उल्लेख करीत पटोले यांनी संपूर्ण घटनाक्रम मांडला. नाशिक पदवीधरच्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने दोन कोरे एबी अर्ज पाठवले होते. ऐनवेळी अशी धोकेबाजी होईल, याची कल्पना नव्हती. सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीला विरोध केला नव्हता. तसे असते तर कोरे अर्ज पाठवले नसते. आम्ही प्रामाणिक असल्याने उमेदवारीला विरोध केल्याचा अप्रमाणिक लोकांनी आरोप करू नये. मुळात उमेदवारीवरून तांबे कुटुंबियात संघर्ष होता, याकडे पटोले यांनी लक्ष वेधले. तांबे कुटुंब हे आपल्यापुरते की पक्षापुरते हे स्पष्ट करायला लावू नका. पक्ष कुणाच्या घरचा नसतो. तो कार्यकर्त्यांचा असतो, असे सुनावत त्यांनी भाजपला जबाबदार धरले. जगातील सर्वात मोठ्या पक्षाला नाशिक मतदारसंघात उमेदवार न मिळणे ही शोकांतिका आहे. यावरून नाव मोठे, लक्षण खोटे असा टोला त्यांनी लगावला.

हेही वाचा… राज्यातील साखर उद्योगावर वर्चस्व प्रस्थापित करण्याचे भाजपचे प्रयत्न सुरू

उमेदवारीवरून तांबे पिता-पुत्रात दुफळी असल्याचे काँग्रेसकडून अधोरेखीत केले जात असताना दुसरीकडे अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे हे उमेदवारी अर्ज आणि त्यावरील राजकारण आमच्या परिवाराला अडचणीत आणण्यासाठी झाल्याचा आरोप ठिकठिकाणच्या प्रचार सभा, बैठकांमध्ये करीत आहेत. याबाबत वेळ आल्यावर आपण बोलणार असल्याचे ते सांगत आहेत. आपण काँग्रेसकडे उमेदवारी देण्याची मागणी केली होती. परंतु, काही कारणास्तव निर्णय झाला नाही. काँग्रेसकडून आपण उमेदवारी अर्जही दाखल केले होते. मात्र एबी अर्ज आपल्यापर्यंत न पोहचल्याने अपक्ष उमेदवारी करावी लागल्याचा दाखला ते देत आहेत. प्रचारात उमेदवारीतील नाट्यपूर्ण घडामोडी कळीचा मुद्दा ठरला आहे. सत्यजित तांबे आणि काँग्रेस यांच्यात परस्परांना जबाबदार ठरविण्याची स्पर्धा लागली आहे. सुधीर तांबेंनी अर्ज न भरल्याने हक्काचा मतदारसंघ काँग्रेसला शिवसेनेसाठी सोडावा लागला. पुन्हा काँग्रेसने प्रचारात अंतर राखले अशी शंका निर्माण होऊ नये म्हणून पटोलेंना तांबेंना साथ देणाऱ्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर कारवाईचा इशारा द्यावा लागला.

हेही वाचा… वंचित व शिवसेना युतीमुळे पश्चिम वऱ्हाडात राजकीय समीकरणे बदलणार

काँग्रेसमधील या संपूर्ण नाट्यामागील सूत्रधार भाजप असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असला तरी अद्याप भाजपने उघडपणे तांबे यांना पाठिंबा जाहीर केलेला नाही. योग्यवेळी भूमिका मांडण्याचा दावा त्यांच्याकडून करण्यात येत असला तरी ती योग्य वेळ कोणती, यावर तांबेंच्या पुढील राजकारणाची दिशा अवलंबून राहण्याची शक्यता आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-01-2023 at 16:14 IST

संबंधित बातम्या