नंदुरबार – नवापूर तालुक्यातील वागदे शिवारात कारवाईसाठी गेलेल्या वन विभागाच्या पथकावर लाकूड तस्करांनी केलेल्या हल्ल्यात वनरक्षकांसह अधिकारी, कर्मचारी जखमी झाले. पोलिसांनी चार संशयितांना अटक केली आहे. संशयितांकडून साग, खैराच्या लाकडासह यंत्रे आणि वाहने असा सुमारे ७० लाखांचा माल ताब्यात घेण्यात आला आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील वागदे गावातील एका घरात मोठ्या प्रमाणात अवैध लाकूड साठा ठेवल्याची माहिती मिळाल्याने नंदुरबार येथील वन विभागाच्या पथकाने  राजेश वसावे (४५) यांच्या घरावर छापा टाकला. त्या ठिकाणी लाखो रुपयांचा अवैध लाकूड साठा, फर्निचर, यंत्रसामग्री असा माल मिळून आला. शेतातील छाप्यातही यंत्रसामग्री मिळाली. कारवाई सुरू असताना वन विभागाच्या पथकावर लाकूड तस्करांनी हल्ला केला. राजेश वसावे याने कुऱ्हाडीने वार केल्याने वनरक्षक दीपक पाटील गंभीर जखमी झाले. काही अधिकारी आणि कर्मचारीही जखमी झाले. पोलिसांनी राजेश वसावे, कैलास पाडवी (रा.देवपूरफळी, नटावद, नवापूर), समीर पठाण (२६, खांडबारा, नवापूर) आणि संतोष वळवी ( ३८, करंजाळी, नवापूर) या चौघांना अटक केली. 

हल्ल्याच्या घटनेनंतर पोलिसांची जादा कुमक मागविण्यात आली. वागदे गावातून शासकीय वाहनातून तसेच मालमोटार, ट्रॅक्टरच्या सहाय्याने अवैध लाकूड साठा व यंत्रसामग्री नवापूर येथील वन आगारात आणण्यात आली. त्याठिकाणी अवैध लाकूडसाठ्याचा पंचनामा, मोजमापाचे काम करण्यात आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कारवाईसाठी नंदुरबार जिल्ह्यातील सर्व वन विभागातील अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. पथकाने सुमारे ५० लाखांचा अवैध लाकूडसाठा आणि २० लाखांची वाहने असा सुमारे ७० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. वन विभागाची वर्षभरातील ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे सांगण्यात येत आहे. सदर कारवाई वनसंरक्षक धुळे प्रादेशिक, पोलीस अधीक्षक नंदुरबार, उपवनसंरक्षक नंदुरबार प्रादेशिक, विभागीय वन अधिकारी दक्षता धुळे, सहायक वनसंरक्षक नंदुरबार यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागाचे पथक, पोलीस अधिकारी, कर्मचारी व इको बटालियनचे अधिकारी व जवान यांच्या मदतीने करण्यात आली.