वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आश्वासन
दिंडोरी तालुका परिसरात बिबटय़ांचे वाढते हल्ले पाहता लखमापूर, म्हेळुस्के, दहेगांव, परमोरी येथील ग्रामस्थांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेतली. ग्रामस्थांच्या अडचणी लक्षात घेतल्यावर मुनगुंटीवार यांनी संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांना बिबटय़ाच्या बंदोबस्तासाठी विशेष अधिकार देण्यात येतील, असे आश्वासन दिले.
लखमापूर येथील महिलेवर बिबटय़ाने केलेला हल्ला, याआधी लहान बालकांचे बिबटय़ांच्या हल्ल्यात गेलेले प्राण, बिबटय़ाची वाढती दहशत यामुळे दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवाळ, माजी सरपंच ज्योती देशमुख, कादवाचे संचालक निंबा देशमुख यांच्यासह अन्य काही ग्रामस्थांनी मुंबई येथे वनमंत्री मुनगंटीवार यांची भेट घेतली.
दोन वर्षांत बिबटय़ाच्या हल्ल्यात मनुष्यहानीसह शेतीसाठीची उपयुक्त जनावरेही बळी पडली आहेत. हे हल्ले रोखण्यासाठी पिंजरे लावण्याचा अधिकार संबंधित अधिकाऱ्यांना नाही, याकडे या शिष्टमंडळाने लक्ष वेधले. वन अधिकाऱ्यांना याबाबत अधिकार देण्यात यावेत, ग्रामीण भागातील एक-दोन खेडय़ातील वस्तीवर पाळीव जनावरांसाठी जाळीचे अनुदान आणि प्रकाश योजनेतून प्रखर प्रकाशझोत असलेले दिवे लावण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली. मुनगंटीवार यांनी मागण्या मान्य करून संबंधित अधिकाऱ्यांना अधिकार देण्यात येतील, असे आश्वासन दिले.