नंदुरबार : काँग्रेसमध्ये अंतर्गत मतभेद झाल्यानंतर दिड वर्षांपूर्वी त्यांनी भाजपला जवळ केले. परंतु, भाजपमध्ये त्यांची फारशी दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे भाजपमध्ये थांबून घुसमट सहन करण्यापेक्षा त्यांनी दुसऱ्या पक्षात जाण्याचे ठरविले. राष्ट्रवादीत (अजित पवार) त्यांचा प्रवेश जवळजवळ निश्चित मानला जात असतानाच त्यांनी आपणास आमदार, मंत्रीपदापर्यंत पोहचविणाऱ्या काँग्रेसमध्ये प्रवेश केला. धक्के देण्यात पटाईत वळवी यांचे राजकीय पक्षांतराचे एक वर्तुळ पूर्ण केले.

ही कहाणी आहे काँग्रेसचे माजी मंत्री पदमाकर वळवी यांची. नंदुरबार जिल्ह्यातून काँग्रेसचे उमेदवार म्हणून दोन वेळा निवडून आलेले आणि आदिवासी विकास राज्यमंत्री, नंतर क्रीडा मंत्री राहिलेले पदमाकर वळवी यांचा शहादा- तळोदा मतदारसंघातून निसटता पराभव झाल्यानंतर काँग्रेसने पदमाकर वळवी यांची कंन्या सीमा वळवी यांना जिल्हा परिषदचे अध्यक्षपदही दिले. परंतु, जिल्ह्यातील अंतर्गत कलहामुळे नाराज पदमाकर वळवींनी भाजपला जवळ केले. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा नंदुरबारमार्गे महाराष्ट्रात दाखल झाल्याच्या दिवशीच वळवी यांनी मुंबई गाठत भाजपमध्ये प्रवेश केल्याने त्यांची चांगलीच चर्चा झाली होती. काँग्रेसचे पाईक राहिलेल्या वळवी यांची ही भूमिका त्यांच्या समर्थकांनाही धक्का देणारी ठरली होती. वर्षभरात त्यांच्याकडे भाजपने सपशेल दुर्लक्ष केले. त्यामुळे विधानसभा निवडणूकत त्यांनी भाजपपासून काडीमोड घेत अक्कलकुवा मतदारसंघातून भारत आदिवासी पार्टीकडून निवडणूक लढवली. परंतु, त्यांचा पराभव झाला.

मागील आठवड्यात वळवी यांनी राष्ट्रवादीचे (अजित पवार) सर्वेसर्वा उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती. त्यांचा राष्ट्रवादी प्रवेशही निश्चित मानला जात होता. काँग्रेसच्या प्रतिभा शिंदे यांच्याबरोबरच ते रविवारी जळगावमध्ये राष्ट्रवादीत प्रवेश करतील, असे मानले जात होते. परंतु, त्याच दिवशी त्यांनी बुलढाणा गाठून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये घरवापसी केली. वळवी यांच्या प्रवेशाने शहादा, तळोदा तालुक्यात काँग्रेसला पुन्हा बळ मिळणारआहे. जिल्हा परिषद निवडणूकांच्या तोंडावर त्यांचा हा प्रवेश भाजपसाठी त्रासदायक ठरु शकतो.

आपल्या काँग्रेस प्रवेशाविषयी वळवी यांनी भूमिका स्पष्ट केली. मी आधीपासून काँग्रेस पक्षात होतो. मध्यंतरी इतर पक्षात गेलो. मात्र माझ्यावर काँग्रेसचे उपकार आहेत. मी आमदार, मंत्री पदापर्यत काँग्रेसमुळे गेलो. काही छोट्या गोष्टीमुळे वातावरण खराब झाल्याने मी वर्षभरासाठी पक्षांतर केले. माझ्या रक्तात काँग्रेस असल्याने पक्षश्रेष्ठींकडे याबाबत माझे विचार मांडल्यानंतर मी पुन्हा प्रवेश केला. आगामी जिल्हा परिषद निवडणूकांमध्ये जे पक्षादेश असतील, त्याप्रमाणे काम करणार असल्याचे वळवी यांनी म्हटले आहे.