नाशिक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थतज्ज्ञ, राजकारणातील चाणक्य आहेत. परंतु, ते शेतकऱ्यांचे सैनिक होऊ शकले नाही याचे दुःख आहे. दुष्काळ पडल्यास कर्जमाफी करू असे सांगितले जाते. त्यामुळे आता कर्जमाफीसाठी आम्ही दुष्काळ पडण्याची वाट पाहायची का, असा संतप्त प्रश्न प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख तथा माजी आमदार बच्चू कडू यांनी केला.
येथे प्रहार संघटनेच्या वतीने आयोजित अपंग गुणगौरव कार्यक्रमासाठी कडू हे आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. कृषिमंत्र्यांच्या हाती आज काहीही राहिलेले नाही. सर्वजण बाहुले झाले आहेत. हिंमत्त असेल तर त्यांनी कर्जमाफी करून दाखवावी, असे आव्हान कडू यांनी दिले. नवे कृषिमंत्री आपण हाडामासाचे शेतकरी असल्याचे सांगतात.
बहुसंख्य आमदार, खासदार हे शेतकरी आहेत. पण त्यांचे हाड किंवा मांस शेतकऱ्यांच्या कामी आलेले नाही. ते राजकीय गुलाम झाले आहेत. यांना पक्षाचा झेंडा महत्त्वाचा आहे. पक्षाची उमेदवारी मागण्यासाठी त्यांना हे कारण लागते. माणिक कोकाटे यांनी आता रमी खेळणे बंद केले पाहिजे, एवढीच अपेक्षा आहे. रमी हा खेळ शासकीय केल्यास अडचण होईल. रमीमुळे लाखो शेतकरी, मजूर यांच्यावर आर्थिक संकट आले आहे. माणिकरावांनी पुढाकार घेऊन हा खेळ बंद केला पाहिजे, अशी मिश्किलीही कडू यांनी केली.
बाह्य स्त्रोतांद्वारे भरतीवर आक्षेप
बिऱ्हाड मोर्चा आंदोलनावर कडू यांनी भाष्य केले. गुरुचे हाल झाले आहे. तो कधी शिक्षण सेवक असतो. शिक्षक झाला तर विनाअनुदानित राहतो. ७५ वर्षात तुम्ही शिक्षण एका छताखाली आणू शकले नाही. शिक्षण सुद्धा समानतेने मिळत नाही. भाजप देश बदलतोय हा नारा देते. काय बदलला देश असा प्रश्न करीत कडू यांनी सरकारी शाळा रिक्त होत असल्याकडे लक्ष वेधले. बाह्य स्त्रोत अर्थात आऊटसोर्सिंगने सरकार जिल्हाधिकारी, तलाठी घेणार आहे का, असा प्रश्न करीत मुख्यमंत्री, मंत्री देखील आऊटसोर्सिंगने घेण्यास काय हरकत आहे, असा टोला त्यांनी लगावला.
मराठी माणसाला न्याय मिळत नाही
राज ठाकरे यांच्या मराठीच्या मुद्यावर कडू यांनी प्रश्न शक्तीचा नसून मराठी व्यवस्थेचा असल्याचे नमूद केले. ती व्यवस्था सुधारावी, एवढाच त्याचा अर्थ आहे. आम्ही त्या वादात पडत नाही. आमचा कष्टकरी समाज आहे. तो सर्व जाती धर्मात आहे. आज कंपनीत काम करणारा कामगार, शेतात राबणारा शेतकरी किंवा मच्छिमार हे सगळे मराठीच आहे. मात्र त्यांना कुठे न्याय मिळतो, असा प्रश्न त्यांनी केला.