रहिवाशांकडून कचरा रस्त्यावर टाकण्यास सुरुवात

नाशिक : महापालिकेच्या वतीने ‘स्वच्छ भारत सर्वेक्षण’अंतर्गत शहर परिसरात फलकबाजीतून उपक्रमाचा गाजावाजा होत असताना शहराची ओळख असलेला पंचवटी परिसर मात्र सध्या कचऱ्याच्या समस्येमुळे त्रस्त आहे. परिसरात गेल्या १५ दिवसांपासून घंटागाडी न फिरकल्याने नागरिकांनी अखेर घरातला कचरा मोकळ्या जागेत टाकण्यास सरुवात केली आहे. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार उपमहापौरांच्या प्रभागात सुरू आहे.

गोदातीरालगत असलेल्या पंचवटी परिसरात दररोज देश तसेच विदेशातून पर्यटक आणि भाविक मोठय़ा प्रमाणावर येत असल्याने खरे तर हा सर्व भाग एकदम चकचकीत ठेवावयास हवा. परंतु सध्या या परिसराला कचऱ्याचे ग्रहण लागले आहे. पंचवटी परिसरातील प्रभाग क्रमांक तीन आणि सहामध्ये कचरा होणारी अनेक ठिकाणे आहेत. महापालिकेने ज्या ठेकेदाराला घंटागाडीचा ठेका दिला. त्याने घंटागाडीचे कर्ज नियमित न फेडल्याने त्याच्या तीन गाडय़ा संबंधित कंपनीने ताब्यात घेतल्या आहेत. दुसरीकडे महापालिकेने त्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकले आहे. प्रशासन-ठेकेदार-वित्तीय संस्था यांच्यातील वादात परिसरातील नागरिक भरडले जात आहेत. घंटागाडी नियमित न आल्याने महापालिकेच्या ऑनलाइन अ‍ॅपवर तक्रार केली. नगरसेवकांकडे दूरध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी दूरध्वनी उचललाच नाही. घरात कचरा साठल्याने कुबट वास येत आहे. अखेर घरात कचरा किती दिवस ठेवायचा म्हणून चौकातील मोकळ्या जागेत हा कचरा टाकत असल्याचे  प्रभाग क्रमांक सहामधील अश्वमेधनगर येथील दिलीप सुतार यांनी सांगितले. तर सतीश वाडेकर म्हणाले, महापालिका कचरा गोळा करताना ओला कचरा-सुका कचरा असे वर्गीकरण करण्यास सांगते. प्रत्यक्षात घंटागाडीत कचरा वेगवेगळा टाकला जात नाही. घरात ओला कचरा किती दिवस ठेवणार? कुजायला सुरुवात झाली आहे. कोरडा कचरा कुठे तरी जाळून टाकतो.

महापालिका किंवा या प्रभागाचे प्रतिनिधित्व करणारे माजी महापौर अशोक मुर्तडक, उपमहापौर भिकुबाई बागुल, पंचवटी प्रभाग सभापती इंगळे हे या समस्येवर कोणताच पर्याय देत नसल्याची खंत वाडेकर यांनी व्यक्त केली.

कचरा मोकळ्या जागी टाकण्यास मीच सांगितले

प्रभाग क्रमांक तीन आणि सहामध्ये कचऱ्याची परिस्थिती बिकट आहे. ठेकेदार आणि वित्तीय संस्थेच्या वादात लोकप्रतिनिधींना आणि नागरिकांना त्रास होत आहे. आरोग्य अधिकारी दूरध्वनी उचलत नाहीत. रोज ५० हून अधिक तक्रारी केवळ कचऱ्याच्या येत असून यामुळे काही वेळा नागरिकांशी वाद होत आहेत. आयुक्तांनी किमान पर्यायी व्यवस्था म्हणून भाडेतत्त्वावर दोन-तीन वाहने उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. या समस्येवर पर्याय म्हणून मोकळ्या जागेत कचरा टाका, असे मी नागरिकांना सुचविले आहे.

– सुनीता पिंगळे  (पंचवटी प्रभाग सभापती)