शिर्डी येथे शुक्रवारी पंतप्रधान आवास योजनेंतर्गत झालेल्या कार्यक्रमात जिल्ह्य़ातील चार लाभार्थ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते घरकुलाची चावी देण्यात आली. नाशिक जिल्हा पंतप्रधान आवास योजनेत २३ हजार ७५७ घरकुलांचे काम पूर्ण करून (८२ टक्के) राज्यात पहिला, तर देशात ३४व्या क्रमांकावर आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यात घरकुल योजनेत सर्वाधिक चांगले काम नाशिक जिल्ह्य़ाचे असल्याने शिर्डी येथे जिल्ह्य़ातील लाभार्थ्यांना बोलविण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी राज्यातील पाच जिल्ह्य़ातून ४० हजार लाभार्थी बोलविण्यात आले होते. त्यातील २० हजार लाभार्थी हे नाशिकचे होते. नगर जिल्ह्य़ाचे १२ हजार, औरंगाबादचे चार हजार, तर बीड, पुणे येथून दोन हजार लाभार्थी कार्यक्रमासाठी बोलविण्यात आले होते. नाशिक जिल्ह्य़ातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील खंबाळा, अंजनेरी येथील नंदा बोंबले, सुरगाणा तालुक्यातील शिवराम वाघमारे, कळवण तालुक्यातील रत्ना दुसाने, सिन्नर तालुक्यातील ठाकरवाडी, तासदरा येथील सखुबाई मेंगाळ या चार लाभार्थ्यांना पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते घरकुलाची चावी प्रदान करण्यात आली. कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गीते, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक प्रमोद पवार यांच्यासह ग्रामसेवक उपस्थित होते.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gharkul key at the hands of the prime minister
First published on: 20-10-2018 at 02:41 IST