जळगाव – जालना जिल्ह्यातील मराठा आंदोलकांवरील लाठीमार समर्थनीय नसून, यात चौकशीत निष्पन्न झालेल्या दोषींना शिक्षा होईलच. मात्र, विरोधक हे सत्तेत असतानाही ते मराठा आरक्षण देऊ शकले नाहीत. त्यांना आता समाजाविषयी कळवळा वाटत असून, त्यांचे प्रेम पुतणा-मावशीचे आहे. यात राजकारण करू नका, असे आवाहन ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी केले.

जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील अद्ययावत शस्त्रक्रियागृहाच्या उद्घाटनानंतर ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार आणि शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टिकास्त्र सोडले. जालना जिल्ह्यात मराठा समाजाचे आंदोलन सुरू झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी उपोषणकर्त्यांशी चर्चाही केली. सर्व त्यांच्या संपर्कात होते. गेल्या चार-पाच दिवसांपासून त्यांचे उपोषण सुरू होते. मीसुद्धा दोन दिवसांपासून त्यांच्या संपर्कात होतो. पाच दिवसांपासून उपोषणामुळे त्यांची तब्येत खालावली होती. डॉक्टरांनीही सांगितले होते, अजून दोन दिवस उपोषण सुरू राहिल्यास त्यांच्या जीवाला धोका होऊ शकतो. मुख्यमंत्री शिंदे हे २० मिनिटे उपोषणकर्त्यांशी बोलले होते. मीही त्यांच्याशी बोललो. मी येतो आणि चर्चा करू. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना भेटू; पण ते होऊ शकले नाही. सरकारला उपोषणकर्त्यांचा जीव वाचविणे महत्त्वाचे होते. उपोषणामुळे त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांच्या जीवाचे बरेवाईट होण्याचा धोका होता. त्यामुळे त्यांचे उपोषण सोडविणे महत्त्वाचे होते. त्यादृष्टीने प्रयत्न सुरू होते. मी स्वतः उपोषणकर्त्यांशी बोललो, पोलीस अधीक्षकांशी चर्चा केली. उपोषणकर्त्यांनी पाणीही घेतले नव्हते. त्यांच्या जीवाशी काळजी सरकार घेत होते. त्यांनी उपोषण सोडावे, चर्चा करावी, असे आमचे मत होते. मात्र, सकाळी पोलिसांनी उपोषणकर्त्यांना समजूनही सांगितले की, तुमच्या जीवाला धोका आहे. तुम्हाला रुग्णालयात दाखल करावे लागेल. आजूबाजूच्या गावांतील ग्रामस्थही तेथे उपस्थित होते. त्याला त्यांनी विरोध केला. त्यातूनच पोलिसांवर दगडफेक झाली. त्यात काही पोलीसही जखमी झाले आहेत. त्यावेळी जनतेचा रोष एवढा वाढला होता, त्यातूनच पोलिसांनी लाठीमार केला. मात्र, तो इतका बेछूट केला की, त्याचे समर्थन कोणीही करू शकणार नाही. त्यासंदर्भातील चौकशीचे आदेश मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहेत. जे चौकशीत दोषी आढळून येतील, त्यांच्यावर कारवाई होणारच, असेही ते म्हणाले.

हेही वाचा >>>सामान्य रुग्णालयात मदर मिल्क बँक स्थापन करणार; पालकमंत्री गुलाबराव पाटील

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महाजन म्हणाले की, विरोधक बोलताहेत हा विषय वेगळा आहे; पण झालेली घटना ही अतिशय दुर्दैवी आहे. मात्र, जे राजकीय नेते आहेत, ते इतक्या तातडीने जाताहेत, त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह इतर पक्षांचे नेत्यांनी जालना जिल्ह्यातील घटनास्थळी धाव घेतली. आताच का समाजाविषयी कळवळा वाटत आहे? शरद पवार यांच्या ५० वर्षांच्या कार्यकाळात, तर उद्धव ठाकरे यांच्या काळात अडीच वर्षे सत्ता असताना मराठा समाजाला त्यांनी आरक्षण दिले नाही. शरद पवार हे एकदा म्हणाले होते, मराठा समाजाला आरक्षणाची गरज का आहे? त्यांच्या या वक्तव्याची ध्वनिफीतही माझ्याकडे आहे आणि ज्यावेळी ११० गोवारींची हत्या झाली, त्यावेळी सत्ताधार्‍यांनी ढुंकूनही पाहिले नव्हते. त्यावेळी त्यांनी राजीनामा दिला नाही आणि त्यांना आता एवढा पुळका का येतोय? शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अडीच वर्षे सत्तेत होते, त्यावेळी त्यांनीही आरक्षणासाठी प्रयत्न केले नाहीत. त्यावेळी ते कधीही घराबाहेर पडले नाहीत. आता आंदोलकांना भेटायला निघाले आहेत. हे पुतणा-मावशीचे प्रेम हे ज्याला आपण मगरमच्छ के आसू म्हणतो, ते आणू नका. यात राजकारण करू नका, असा टोलाही मंत्री महाजन यांनी विरोधकांना लगावत, मराठा समाजाला आरक्षण देण्याचे काम कोणी केले, तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाच झाले होते. मात्र, सत्ता असताना विरोधकांना ते न्यायालयात टिकविता आले नाही. त्यांनी त्यासाठी चांगला वकील देण्याचा प्रयत्न केला नाही. आता विरोधकांकडून जे चाललेले, ते राजकीय ढोंग आहे, असे घणाघाती टीकाही मंत्री महाजन यांनी केली.