नाशिक : बिहारमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) मिळविलेल्या दणदणीत यशाचे श्रेय अनेकांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या कामगिरीला दिले जात असले तरी भाजपचे उत्तर महाराष्ट्रातील नेते मात्र एनडीएला मिळालेल्या या यशामागे पायगुण महत्वाचा असल्याचे मानत आहेत. भाजपचे मंत्री गिरीश महाजन आणि धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी बिहारमधील यशाचे श्रेय दिलेल्या व्यक्ती तरी कोण, असा प्रश्न अनेकांना पडला असेल.

बिहार विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी एनडीएने २४३ पैकी २०२ जागा जिंकून इंडिया आघाडीचे पानिपत केले. इंडिया आघाडीला केवळ ३५ जागा मिळाल्या. बिहारमधील या यशामागे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतलेल्या सभा, आखलेली रणनीती, बिहारमध्ये निवडणुकीच्या काही दिवस आधी महिलांना आकर्षित करण्यासाठी जीविका दीदी योजनेतंर्गत केंद्राच्या सहकार्याने दीड कोटी महिलांच्या हाती १० हजार रुपये पडतील अशी योजना आखणे, मुख्यमंत्री नितीश कुमार यांची महिलांमध्ये असलेली स्वच्छ प्रतिमा या गोष्टी कारणीभूत ठरल्या. त्यामुळे सर्वजण पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांना विजयाचे श्रेय देत आहेत. परंतु, महाराष्ट्रातील कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांना आणि धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांचे मत मात्र काहीसे वेगळे आहे.

शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) खासदार खासदार राजाभाऊ वाजे यांचे काका तथा सिन्नरचे माजी नगराध्यक्ष हेमंत वाजे यांनी शुक्रवारी काही माजी नगरसेवकांसह मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. नाशिक शहरातील भाजपच्या वसस्स्मृती या कार्यालयात शुक्रवारी पक्ष प्रवेश सोहळा झाला. हेमंत वाजे यांच्या पक्ष प्रवेशावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी, वाजे यांचा  पायगुण चांगला आहे. त्यामुळे बिहारमध्ये भाजपला आजच घवघवीत यश मिळाले आहे.

आता सिन्नरमध्येही शंभर टक्के विजयी होऊ, असा विश्वास व्यक्त केला. वाजे यांचा पक्षप्रवेश आणि बिहार निवडणुकीतील यश यांचा काय संबंध, याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये रंगली. धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा नगरपरिषद निवडणुकीत धुळ्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या मातोश्रींनी शुक्रवारी उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला.

बिहार विधानसभेतील यशाबद्दल जयकुमार रावल यांनी  प्रतिक्रिया देताना या निकालाचा प्रभाव आता महाराष्ट्रातही उमटेल, असा विश्वास व्यक्त केला. दोंडाईचा नगरपरिषद निवडणुकीत २७ पैकी २६ जागांवर विजय निश्चित असल्याचा दावा त्यांनी केला. आज आमचा लकी डे आहे. आमच्या आईसाहेबांनी अर्ज भरला. आणि त्याचवेळी बिहारमध्ये महायुतीची सत्ता स्थापन झाली. त्यामुळे महाराष्ट्रातही आमचे यश निश्चित असल्याचेही जयकुमार रावल यांनी नमूद केले.