नाशिक – आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने महाविकास आघाडीसह महायुतीतील मित्रपक्षांनाही हादरे देण्यास सुरुवात केली आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीमधून हकालपट्टी करण्यात आलेले दिंडोरीचे माजी आमदार रामदास चारोस्कर आणि सुनीता चारोस्कर यांनी सोमवारी भाजपमध्ये प्रवेश केला. मागील विधानसभा निवडणुकीत सुनीता चारोस्कर यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते नरहरी झिरवळ यांच्या विरोधात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली होती. विरोधकांनाच पक्षात घेऊन भाजपने वेगळी खेळी केली आहे. चारोस्करांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने दिंडोरीत भाजपची ताकद आणखी वाढली आहे. चारोस्कर यांच्या पक्ष प्रवेश सोहळ्यात मंत्री गिरीश महाजन यांनी केलेले वक्तव्य चर्चेत आले आहे. त्यामुळे भाजप अजित पवारगटाचे मंत्री नरहरी झिरवळ यांनाही धक्का देण्याच्या तयारीत असल्याचे दिसते.
दिंडोरीचे माजी आमदार रामदास चारोस्कर यांच्या पत्नी सुनीता चारोस्कर यांनी मागील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून (शरद पवार) विद्यमान मंत्री नरहरी झिरवळ यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत सुनीता चारोस्कर यांचा ४४ हजार ४०३ मतांनी पराभव झाला होता. त्यांना ९४ हजार २१९ मते मिळाली होती. ही पार्श्वभूमी लक्षात घेऊन चारोस्कर यांच्या भाजप प्रवेश सोहळ्यात मंत्री गिरीश महाजन यांनी, दिंडोरीत पुढच्या वेळी भाजपचा आमदार द्या, असे आवाहन केले. महाजन यांच्या वक्तव्याचा थेट अर्थ लावायचा असेल तर पुढील निवडणुकीत नरहरी झिरवळ यांना पराभूत करा, असा होतो. त्यामुळे महाजन यांच्या वक्तव्याची चर्चा होत आहे.
रामदास चारोस्कर साहेब, आता कुठे जाऊ नका, हा तुमचा शेवटचा प्रवेश, असा हसतखेळत टोलाही महाजन यांनी रामदास चारोस्कर यांच्या पक्षबदलू वृत्तीला हाणला. भाजप हा सर्वसामान्यांचा, कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, यात घराणेशाहीला थारा नाही. भाजपमध्ये सर्वांना संधी आहे, श्रद्धा आणि संयम ठेवणे आवश्यक आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे खंबीर नेतृत्व आपल्याबरोबर आहे. लोकसभेला फटका, पण विधानसभेला यश मिळाले. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी. तुम्ही शब्द दिला आहे. सर्व उमेदवार निवडून आणा. आम्ही विकास कसा करतो ते बघा, असे आश्वासन गिरीश महाजन यांनी दिले. रामदास चारोस्कर यांनी, दोन वेळेस दिंडोरीतील जनतेने विधानसभा निवडणुकीत काम करण्याची संधी दिल्याचा उल्लेख केला.सध्या तालुक्यात अनेक प्रश्न, समस्या आहेत. त्यामुळे काम करण्याची गरज असल्याचे सांगितले.
