रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेमुळे बालिका सुखरुप

नाशिक : आठशे रुपयांच्या उधारीवरून सात महिन्याच्या बालिके चे काकाने अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकरोड येथे उघडकीस आला. रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेमुळे ही बालिका सुखरूपपणे आई-वडिलांच्या कुशीत विसावली. शनिवारी सायंकाळी नाशिकरोड परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळून सात महिन्याच्या बालिकेचे अपहरण करण्यात आले. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात तक्रारीनंतर गुन्हाही दाखल करण्यात आला.  दादर लोहमार्ग पोलिसांना ही मुलगी सापडली. या मुलीचे अपहरण तिचा चुलता राजू तेलोरे याने केल्याचे उघड झाले आहे.

मुलीचे वडील आणि राजू यांच्यात आठशे रुपयांच्या उधारीवरून वाद झाला होता. मुलीला नेले तर मुलीचा बाप पैसे देईल म्हणून राजूने सात महिन्याच्या बालिके चे अपहरण केले होते. हा प्रकार कोणाच्या लक्षात येऊ नये यासाठी राजूने प्रथम नंदीग्राम एक्स्प्रेसने मुंबई गाठण्याचे ठरविले. दादर रेल्वे स्थानकात तो मुलीला घेऊन उतरला असता तेथे दादर लोहमार्ग पोलिसांनी त्याला हटकले. त्याने ही मुलगी माझी असून आमचे पती-पत्नीचे नाशिकरोड येथे भांडण झाल्यामुळे मी तिला घेऊन जात असल्याचा बनाव त्याने केला. लोहमार्ग पोलिसांनी अधिक तपास केला असता तो गांगरून गेला. त्याच ठिकाणी मुलीला सोडून पोलिसांना गुंगारा देऊन पसार झाला.

याप्रकरणी दादर लोहमार्ग पोलिसांनी नाशिकरोड पोलिसांशी संपर्क साधला असता या मुलीचे अपहरण झाल्याचा गुन्हा नाशिकरोड पोलीस ठाण्यात दाखल असल्याचे सांगण्यात आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बिजली यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार भोईर यांनी दादर येथे जाऊन या मुलीला ताब्यात घेतले. नाशिकला आल्यावर तिच्या आईच्या स्वाधीन केले.