जळगाव – शहरातील सुवर्ण बाजारपेठेत काही दिवसांपूर्वी सोने आणि चांदीने चांगलेच नाव कमावले होते. मात्र, आता दोन्ही धातुंच्या दरात घट झाल्याचे दिसून येत आहे. प्रत्यक्षात, अपेक्षित ग्राहक वर्ग खरेदीसाठी फिरकत नसल्याने बाजारात सगळीकडे निरूत्साहाचे वातावरण आहे. व्यावसायिकांनाही मंदीचा सामना करावा लागत आहे.

रशिया-युक्रेन युद्ध संपुष्टात येण्याच्या शक्यतेने आंतरराष्ट्रीय बाजारात सकारात्मक संकेत दिसू लागले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे दोन्ही देशांमध्ये तडजोडीचे प्रयत्न करत असून त्याचा थेट परिणाम मौल्यवान धातुंच्या किमतींवर झाला आहे. सोन्याच्या किमतीत घसरण दिसून आली असून, त्याचवेळी चांदीच्या किमतीतही घट नोंदवली गेली आहे. दरम्यान, आगामी आठवड्यात सणासुदीचा हंगाम सुरू होत असल्याने विशेषतः सोन्याच्या मागणीत लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे किमतींमध्येही चढ-उतार दिसून येऊ शकतात. सध्याच्या दर घसरणीच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदार आणि ग्राहकांनी संधी साधत नियोजनबद्ध खरेदी करावी, असा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जात आहे.

भारतात सोने हे फक्त गुंतवणुकीचे साधन मानले जात नाही. ते परंपरा तसेच श्रद्धा आणि सांस्कृतिक वारशाशी घट्ट जोडलेले आहे. लग्न समारंभ असो किंवा सण-उत्सव सोन्याची खरेदी ही शुभ आणि समृद्धीचे प्रतीक मानली जाते. विशेषतः गणेश चतुर्थी, नवरात्र आणि दिवाळी यांसारख्या सणांच्या काळात सोने खरेदीची परंपरा अधिक जोमाने पाळली जाते. अलीकडेच सोन्याच्या किमतींनी ऐतिहासिक उच्चांक गाठला होता. त्यामुळे अनेक ग्राहकांनी खरेदी पुढे ढकलली होती. मात्र, किंमत घसरल्यामुळे खरेदीदारांना आता पुन्हा बाजारात सोने खरेदीची संधी मिळत आहे. दुसरीकडे आता मंदी जाणवत असली तरी आगामी सणासुदीच्या हंगामात सोन्याची मागणी आणखी वाढेल, अशी आशा व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.

जळगावमध्ये रक्षाबंधनापूर्वी २४ कॅरेट सोन्याचे दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख चार हजार ५४५ रूपयांपर्यंत पोहोचले होते. मात्र, मंगळवारी सोन्याचे दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख दोन हजार २७९ रूपयांपर्यंत खाली आले. सोन्यात तब्बल २२६६ रूपयांची घट नोंदविण्यात आल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला. सोन्यात अलिकडच्या काळात मोठे चढ-उतार पाहण्यास मिळत असले, तरी त्याचे दर अजुनही एक लाखांवरच आहेत. त्यामुळेही ग्राहकांनी सोने खरेदीसाठी थोडा हात आखडता गेल्याचे सुवर्ण व्यवसायातील जाणकारांनी सांगितले.

चांदीच्या दरात १०३० रूपये घट

जळगावमध्ये रक्षा बंधनापूर्वी चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो एक लाख १९ हजार ४८० रूपयांपर्यंत पोहोचले होते. त्या तुलनेत मंगळवारी १०३० रूपयांची घट झाल्याने चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो एक लाख १८ हजार ४५० रूपयांपर्यंत खाली आले. परिणामी, ग्राहकांना काहीअंशी दिलासा मिळाला.