जळगाव – शहरातील सराफ बाजारात शनिवारी २४ कॅरेट सोन्याचे दर जीएसटीसह प्रतितोळा ९८ हजार ७७७ रुपयांपर्यंत पोहोचले होते. सोमवारी दिवसभरात ११३३ रुपयांची वाढ नोंदविण्यात आल्याने सोन्याचे दर ९९ हजार ९१० रुपयांपर्यंत गेले. हा सोने दराचा नवीन उच्चांक आहे.

अमेरिकेने आयात शुल्कवाढीची घोषणा केल्यानंतर सुरुवातीला सोन्याच्या दरात बऱ्यापैकी घसरण झाली होती. मात्र, अवघ्या काही दिवसातच सोन्याच्या दराने पुन्हा जोरदार उसळी घेतली. सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांनाही या कालावधीत मोठा परतावा मिळाला आहे. सोने सर्वकालिन उच्चांकावर पोहोचल्यानंतर संबंधितांना बँकेत वर्षभर पैसे ठेवूनही जितके व्याज मिळाले नसते, त्यापेक्षा जास्त परतावा सोन्यात गुंतवणूक केल्याने मिळाला आहे.

दरम्यान, सोन्याच्या किमती दररोज नवीन उच्चांक गाठत असताना सुवर्ण व्यवसायातील तज्ज्ञांनाही आता संभ्रमात टाकले आहे. बाजारातील अस्थिरतेमुळे आणि जागतिक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सोने दरवाढीबाबतचा कोणताही ठोस अंदाज वर्तविणे त्यांच्यासाठी आव्हानात्मक बनले आहे. चांगल्या परताव्यासाठी सोने खरेदी करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठीही योग्य निर्णय घेणे कठीण झाले आहे. सध्याची परिस्थिती लक्षात घेता थांबा आणि वाट पाहा, अशी भूमिका बऱ्याच गुंतवणूकदारांनी घेतल्याचे चित्र आहे.

दुसरीकडे, अक्षय्य तृतियेचा सण जवळ आला असताना मुहुर्तावर सोने खरेदी करता यावे म्हणून ग्राहक दर कमी होण्याची वाट पहात होते. मात्र, अक्षय्य तृतीया जसजशी जवळ येत आहे, तसे सोन्याचे दर आवाक्याबाहेर जाऊ लागले आहेत. सोने उत्तरोत्तर वाढत असताना, त्यात येत्या काही दिवसात मोठी घट होण्याची आशा सुवर्ण व्यावसायिकांनी सोडून दिली आहे. अमेरिका आणि चीनमधील व्यापार युद्धावर काही सकारात्मक चर्चा झाली तरच पुढे सोन्याच्या किमतीतील वाढ थांबू शकते. सोने दराने मंगळवारी एक लाखांचा ऐतिहासिक टप्पा ओलांडल्यास त्याचा मोठा दूरगामी परिणाम सुवर्ण व्यवसायावर पुढील काळात होण्याची भीती आता व्यक्त होत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चांदीच्या दरात पुन्हा घसरण

सोने दरात सातत्याने वाढ होत असताना, जळगावमध्ये चांदीचे दर तीन दिवसांपासून प्रतिकिलो ९९ हजार ९१० रुपयांपर्यंत स्थिर होते. मात्र, सोमवारी ५१५ रुपयांची घट झाल्याने चांदीचे दर प्रतिकिलो ९९ हजार ३९५ रुपयांपर्यंत घसरले.