जळगाव : शहरातील सुवर्ण बाजारात शुक्रवारी सोन्याच्या दराने नवीन उच्चांक प्रस्थापित केला. दर ९१ हजार ४६४ रुपये प्रतितोळा (जीएसटीसह) झाला. सोन्याच्या दरातील ही आजपर्यंतची सर्वोच्च वाढ असल्याचे सुवर्ण व्यावसायिकांनी सांगितले.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून अनेक देशांवर वाढीव आयात शुल्क आकारण्यात येत आहे. यातून जागतिक व्यापार युद्धाच्या शक्यतेने निर्माण झालेल्या अनिश्चिततेत, सुरक्षित पर्याय असलेल्या सोन्याकडे ओढा वाढल्याने सुरू असलेल्या दरातील तेजीने शुक्रवारी कळस गाठला आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्याने प्रति औंस ३ हजार डॉलरच्या अभूतपूर्व पातळीपुढे झेप घेतली.

जळगावमध्ये याआधी १४ फेब्रुवारी रोजी सोन्याच्या दराने ८९,०९५ रुपये हा उच्चांक गाठला होता. त्यानंतर दर खाली-वर होत राहिले. गुरुवारी २४ कॅरेट सोन्याच्या दराने जीएसटीसह ८९,९१९ रुपये प्रतितोळा अशी झेप घेत फेब्रुवारीमधील उच्चांक मोडला. हा उच्चांकही दुसऱ्याच दिवशी शुक्रवारी सुमारे १,३३९ रुपयांची वाढ झाल्याने मागे पडला. सोने ९१,४६४ रुपयांपर्यंत पोहोचले. अशाच प्रकारे चांदीच्या दरातही एकाच दिवसात २,५७५ रुपयांची वाढ नोंदवण्यात आली. त्यामुळे चांदी जीएसटीसह एक लाख चार हजार ५४५ रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचली.

सध्या सोन्याच्या भावात तेजीचे वारे सुरू आहे. जागतिक पातळीवर अनिश्चितता कायम राहिल्यास ही तेजी पुढेही सुरूच राहील. – नितेश शहा, कमॉडिटी तज्ज्ञ, विस्डम ट्री

१३ वेळा उच्चांकी पातळी

ट्रम्प यांनीच सोन्याच्या मागणी वाढविण्यात फार महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ट्रम्प यांच्या धोरणांमुळेच वित्तीय बाजारपेठांमध्ये अस्थितरतेचे वातावरण असून, मंदीचे सावटही गडद होत आहे.

ट्रम्प यांनी युरोपातून येणाऱ्या वाईनवर २०० टक्के आयात शुल्क आकारण्याचा इशारा दिला आहे. या सर्व अस्थिर वातावरणामुळे गुंतवणूकदार सोन्याला पसंती देत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

परिणामी या मौल्यवान धातूचा भाव आंतरराष्ट्रीय बाजारात शुक्रवारी प्रति औंस ३,००४ डॉलरपर्यंत वधारला. एक औंस म्हणजे २८.३५ ग्रॅम वजन होते. सोन्याच्या भावाने अलीकडच्या काळात सलग १३ वेळा नवनवीन उच्चांकी पातळी गाठणारी विक्रमी तेजी दर्शविली आहे.